पावसाळयापुर्वीच शेतकर्यांच्या कापसाचे माप होणे गरजेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बीड दि.18(प्रतिनिधी)ः- कृषि उत्पन्न बाजार समितीकडे 6371 शेतकर्यांनी नोंदणी केली असून शेतकर्यांच्या कापसाचे मोजमाप धिम्या गतीने चालू आहे. बीड तालुक्यासह जिल्ह्यातील अन्य तालुक्यातही शेतकर्यांच्या कापसाचे मोजमाप नियोजन करणे गरजेचे असून शेतकर्यांचे नुकसान टाळण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तात्काळ आदेश द्यावेत अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीडसह जिल्ह्यातील शेतकर्यांचा कापूस 15 दिवसांत मोजमाप करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. बीड बाजार समितीकडे 6371 शेतकर्यांनी नोंदणी केली असून आतापर्यंत फक्त 677 शेतकर्यांचे कापसाचे मोजमाप झाले आहे. उर्वरीत 5694 शेतकर्यांच्या कापसाचे मोजमाप प्रतिक्षेत आहे. आता पावसाळा जवळ येत असून धिम्या गतीने मोजमाप चालू राहिल्यास शेतकर्यांचा कापूस पडून राहिल. सध्या शेतकर्यांना पेरणी, बी-बियाणे, खते आदि खरेदीसाठी आर्थिक मदत पूर्ण होणे गरजेचे असून खाजगी खरेदीदार 3 ते 4 हजार रूपये अल्प दराने खरेदी करत आहेत यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होत असून आपण याची तात्काळ दखल घ्यावी. काही जिनिंगवर ग्रेडर यांच्याकडून शेतकर्यांची अडवणूक केली जात असून ज्या बाबत जिल्हाधिकारी यांनी 50 ते 80 कापसाची वाहने तोलण्याचे आदेश दिले आहेत मात्र तेवढ्या प्रमाणात मोजमाप केले जात नाही. ग्रेडरकडून शेतकर्यांची अडवणूक झाल्यामुळे नुकसान होऊ लागले आहे. बीड तालुक्यात 9 खरेदी केंद्रांना मान्यता असून सध्या बीड स्थानिकला चार जिनिंग कार्यरत आहेत. या जिनिंगवर प्रत्येकी 20 वाहनांचे मोजमाप धिम्या गतीने केले जात आहे. करार केलेल्या 8 कापूस जिनिंगवर दररोज 60 ते 80 वाहनांचे मोजमाप झाले तरच पावसाळ्यापुर्वी शेतकर्यांचा कापूस खरेदी केला जाईल. 15 दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला असून कापसाचे मोजमाप झाल्यास शेतर्यांना पेरणीसाठी बी-बियाणे, खते खरेदीसाठी मोठा आधार मिळेल. यासाठी पणन महासंघ, सी.सी.आय.चे ग्रेडर यांना तात्काळ सुचना करून आदेश देण्यात यावेत अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.