ऑनलाइन वृत्तसेवाविदेश

कोरोनाचा कहर कायमच:अमेरिकेत दिवसभरात करोनाचे तब्बल 2 लाख 77 हजार रूग्ण

वॉशिंग्टन – जगभरातील करोना रूग्णांचे प्रमाण कमी होत असताना अमेरिकेत मात्र करोनाचा कहर पुर्वी इतक्‍या प्रमाणातच कायम आहे. आज दिवसभरात तेथे करोनाचे तब्बल 2 लाख 77 हजार रूग्ण आढळून आले असून एकाच दिवसात इतक्‍या मोठ्या प्रमाणात तेथे रूग्ण सापडण्याचा हा एक विक्रमच मानला जात आहे. अमेरिकेत आत्तापर्यंत 2 कोटी 40 लाख लोकांना करोनाची लागण झाली असून त्या देशातील साडे तीन लाख लोक या रोगाने दगावले आहेत.

ख्रिसमसच्या काळात ठिकठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेऊन करोनाचा मोठ्या प्रमाणात कहर होईल असा अंदाज अनेक तज्ज्ञांनी वर्तवला होता.तो खरा ठरला आहे. अमेरिकेत करोना विषयक निर्बंधांचे काटेकोर पालन होताना दिसून येत नाही तसेच तेथे सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याविषयीही मोठ्या प्रमाणात बेफिकीरी दाखवली जात आहे.त्यातून हा प्रसार वाढत आहे असे सांगितले जाते.

अमेरिकन सरकारने करोनाच्या फायझर लसीला तेथे अनुमती दिली आहे.त्यानुसार तेथील नागरीकांचे लसीकरण सुरू झाले असले तरी या लसीच्या वाहतूक आणि साठवणूक प्रकारात अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. वैद्यकीय यंत्रणा मोठ्या प्रमाणात रूग्णांवर उपचार करण्यात व्यस्त आहे. त्यामुळे लसीकरणासाठी वेैद्यकीय कर्मचाऱ्यांचीही तेथे चणचण भासत आहे. त्या देशात आत्तापर्यंत 42 लाख लोकांना करोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.