ऑनलाइन वृत्तसेवानवी दिल्लीपुणे

गुड न्यूज:सिरमच्या लसीला आपत्कालीन वापरास मंजुरी लवकरच लसीकरण सुरू होणार

पुणे/नवी दिल्ली – पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया उत्पादित करत असलेल्या अणि ऑक्‍सफर्ड विद्यापीठ-ऍस्ट्राझेन्का यांनी विकसित केलेल्या लसीच्या आपत्कालीन वापराला औषध नियामकांच्या विषय तज्ज्ञ समितीने शुक्रवारी मान्यता दिली. त्यामुळे या लसीकरणाच्या देशव्यापी मोहीमेला लवकरच सुरवात होण्याची आशा आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीरमच्या लसीला दिलेली आपत्कालीन वापराची मान्यता ही सशर्त आहे. या मान्यतेमुळे औषध नियामकांची परवानगीही तातडीने मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. एकदा ही परवानगी मिळाली की येत्या सात ते दहा दिवसांत लसीकरणाची सुरवात करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.

इंग्लंडच्या औषधे आणि वैद्यकीय उत्पादने नियामकांनी ऑक्‍सफर्ड-ऍस्ट्राझेन्का यांचे उत्पादन असणाऱ्या कोविशिल्डच्या वापराला 30 डिसेंबर रोजी मान्यता दिली होती. अर्जेंटिना या लसीला आधिच मान्यता दिली आहे. देशांत जुलै महिन्यापर्यंत 30 कोटी लोकांना लस देण्यासाठी 96 हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे.

सीरमने दिलेल्या महितीनुसार कोविशिल्डचे पाच कोटी डोसचा साठा सध्या तयार आहे. त्यात प्रत्येक आठवड्यात वाढ होत जाईल. या लसीची निर्यात अद्याप सुरू झाली नाही. त्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळणे आवश्‍यक आहे. ती महिनाभरात मिळू शकते. त्यामुळे या साठ्याचा मोठा भाग भारतात वापरणे शक्‍य होणार आहे. त्याची रंगीत तालीम उद्यापासून सुरू होणार आहे.

औषध नियामकांच्या विषय तज्ज्ञांच्या समितीने अद्याप फायझर आणि बायोटेककडून विकसित केलेल्या लसीला परवानगी दिलेली नाही. कोविशिल्ड ही दोन ते आठ अंश या साध्या फ्रिजच्या तापमानात साठवता येते. त्यामुळे या लसीला फायझर आणि मॉर्डना यांच्या लसीपेक्षा अधिक प्राधान्य दिले जाण्याची शक्‍यता आहे. कारण या दोन लसींसाठी अतीशीत स्थिती आवश्‍यक असते. जी भारतासारख्या उष्ण कटीबंधीय देशांत शक्‍य होणे दुरापास्त आहे.