महाराष्ट्रमुंबई

आमदारांना ईडीची नोटीस पाठवून राज्यातील सरकार पाडण्याचा विरोधकांचा डाव-खा संजय राऊत

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मला भाजपच्या हस्तकांनी या ना त्या प्रकारे धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. या हस्तकांनी मला 22 आमदारांची एकच यादी दाखवली. या आमदारांना ईडीची नोटीस पाठवून राज्यातील सरकार पाडण्याचा विरोधकांचा डाव आहे, असा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन हा मोठा आरोप केला. गेल्या एका वर्षापासून भाजपचे महत्त्वाचे नेते आणि हस्तक मला सातत्याने भेटण्याचा प्रयत्न करत आहते. सरकार टिकवू देऊ नका. सरकारच्या मोहात पडू नका. आम्ही सरकार पाडण्याची तयारी झाली आहे, असं मला सांगत असून धमकावलले जात आहे.

आमच्याकडे ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग आहे, आम्ही तुम्हा सर्वांना टाईट करणार आहोत, असेही मला धमकावले जात आहे. पण मी त्यांना बधलो नाही. मीही त्यांचा बाप आहे, असे राऊत म्हणाले.

भाजपच्या या हस्तकांनी मला 22 आमदारांची यादी दाखवली. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांची नावं होती. या आमदारांवर ईडीचा दबाव आणून त्यांचे राजीनामे घेतले जाईल आणि सरकार पाडलं जाणार असल्याचं मला सांगण्यात आलं. प्रताप सरनाईक हे त्याचं टोकून असून आम्ही सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही, आमची तयारी झाली आहे, असे या हस्तकांनी सांगितल्याचा गौप्यस्फोट राऊत यांनी केला.

सरकार पाडण्यात हे हस्तक अपयशी ठरले आहे. कारण त्यांची डेडलाईन नोव्हेंबरची होती. म्हणूनच सरकारचे खंदे समर्थक आणि सरकार बनविण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाच्या नेत्यांना त्रास देण्याचं काम ईडी मार्फत केलं जात आहे, असा दावाही त्यांनी केला.