घाबरण्याचे कारण नाही:नव्या करोनाचा एकही रुग्ण भारतात आढळलेला नाही.
नवी दिल्ली – करोनाच्या विषाणूमध्ये म्युटेशन (बदल) होऊन तयार झालेला हा नवा विषाणू आणखी घातक असण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञांनी या विषाणुला B.1.1.7 असे नाव दिले आहे.
करोना विषाणूच्या या नव्या स्ट्रेनमुळे जगभरातील अनेक देशांचे धाबे दणाणले आहेत. त्यातही प्रामुख्याने ब्रिटनमधून लोकांची ये-जा सुरु असलेले देश अधिक चिंतेत आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूची नवी प्रजाती अद्याप भारतात कुठेही आढळलेली नाही, अशी माहिती निती आयोगाच्या आरोग्य विभागाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली आहे.
व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, नव्या करोना विषाणूमुळे बाधित झालेला एकही रुग्ण भारतात आढळलेला नाही.
कोरोना विषाणूमध्ये आतापर्यंत 17 वेळा बदल झाले आहेत. विषाणूंमध्ये म्यूटेशन होत असते. ब्रिटनच्या शास्त्रज्ञांशी बोलल्यानंतर कोरोना विषाणूची संसर्गक्षमता वाढल्याची माहिती त्यांनी दिली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली होती.
करोनावर जी लस तयार होत आहे ती लस म्यूटेशन झालेल्या कोरोना विषाणूला थोपवू शकेल की नाही, याबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहे. या शंकांचेही व्ही. के. पॉल यांनी खंडण केले. ते म्हणाले की, करोनावर परिणामकारक लस तयार केली जात आहे. कोरोना विषाणूच्या म्यूटेशनमुळे लसीच्या परिणामकारकतेवर कोणताही परिणाम होणार नाही. याचाच अर्थ म्यूटेशन झालेल्या विषाणूलाही ही लस थोपवू शकेल, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही.