ऑनलाइन वृत्तसेवादेशनवी दिल्ली

रेशन कार्डवर 3 महिने धान्य खरेदी केली नाही तर कार्ड रद्द होणार:नेमकं सत्य काय ते जाणून घ्या

मुंबई, 19 डिसेंबर : स्वस्त धान्य खरेदीसाठी आवश्यक असलेल्या रेशन कार्ड संबंधीच्या (Rations Card) बातम्यांवर केंद्र सरकारनं (Central Government) एक महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे. रेशन कार्डवर 3 महिने धान्य खरेदी केली नाही तर कार्ड रद्द होणार अशी बातमी काही दिवसांपूर्वी पसरली होती. ही बातमी निराधार असल्याचं स्पष्टीकरण सरकारनं दिलं आहे.

काय आहे सरकारचं स्पष्टीकरण?

“रेशन कार्डवर तीन महिने धान्य खरेदी केली नाही, तर ते रद्द करण्यात यावं अशी सूचना केंद्र सरकारनं राज्यांना केली आहे, असा दावा काही मीडिया रिपोर्टमध्ये (Media Report) करण्यात आला होता.

तो दावा निराधार आहे. केंद्र सरकारनं राज्यांना अशी कोणतीही सूचना दिलेली नाही,” असं स्पष्टीकरण सरकारनं दिले आहे.

काय होती खोटी बातमी?

‘रेशन कार्ड तीन महिन्यांनी रद्द होणार’ असं वृत्त काही माध्यमांनी बुधवारी प्रसिद्ध केल्यानं खळबळ उडाली होती. ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ (One Nation One Ration Card) या योजनेनुसार तीन महिने कोणतीही धान्य खरेदी केली नाही तर कार्ड रद्द होणार आहे. आंध्र प्रदेश, गोवा, गुजरात, हरयाणा, कर्नाटक, केरळ, तेंलगणा, त्रिपूरा आणि उत्तर प्रदेश या नऊ राज्यांनी या आदेशाची अंमलबजावणी सुरु केली आहे,’ असा दावा या वृत्तामध्ये करण्यात आला होता.

कोरोना व्हायरस महामारीच्या (Coronavirus pandemic) काळात कोणत्याही व्यक्तीचा भूकबळी जावू नये म्हणून केंद्र सरकारनं मे 2020 मध्ये ‘वन नेशन वन रेशन कार्ड ही योजना सुरु केली. त्यानंतर लगेच पुढच्या महिन्यापासून या योजनेची अंमलबजावणी सुरु झाली. सध्या 23 राज्यातील 87 कोटी नागरिक या योजनेचे लाभार्थी आहेत. मार्च 2021 पर्यंत संपूर्ण देशात ही योजना लागू करण्याचे केंद्र सरकारचे उद्दीष्ट आहे.