धक्कादायक:गाढवाची विष्ठा, ऍसिड आणि भुसा (वाळलेले गवत) यापासून बनवला नकली मसाला
तुम्ही वापरत असलेले मसाले भेसळयुक्त तर नाहीत? कारण उत्तर प्रदेशमध्ये हाथरसयेथे पोलिसांनी एका मसाला उत्पादक कारखान्यावर छापा टाकला. यावेळी गाढवाची विष्ठा, ऍसिड आणि भुसा (वाळलेले गवत) यापासून नकली मसाला बनवण्यात येत असल्याचे उघड झाले. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिले आहे.
सोमवारी रात्री पोलिसांनी नकली मसाला बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला. स्थानिक बाजारपेठेत हा मसाला टॉपचा ब्रँड म्हणून विकला जात होता. छापेमारीत पोलिसांनी 300 किलो नकली मसाला जप्त केला. तसेच कंपनीचा मालक अनुप वार्ष्णेय याला पोलिसांनी अटक केली आहे. वार्ष्णेय हिंदू युवा वाहिनीचा मंडल प्रहरी असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी हाथरस भागात असणाऱ्या या कारखान्यावर छापा टाकला तेव्हा तिथे लाल मिरची पावडर, धने पावडरसह अनेक मसाले आढळून आले. गरम मसाला आणि हळद पावडर बनवण्यासाठी गाढवाची लिद (विष्ठा), ऍसिड आणि भुसा यांचा वापर होत असल्याचे समोर आले.
छापेमारीनंतर पोलिसांनी 27 नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले. यात वरील गोष्टींचा उलगडा झाला. यानंतर कारखाना मालक अनुप वार्ष्णेय याला अटक करून त्याच्यावर कलम 155 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.