मराठा सामाजाला आरक्षण देताना इतर समाजाच्या हक्काला धक्काही लागणार नाही-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. सर्वानुमते आपण ही लढाई लढत आहोत. मला खात्री आहे ही लढाई आपण जिंकणारच. पण काही समाजविघातक शक्ती जातीपातीत संघर्ष निर्माण करण्याचे काम करीत आहेत. तरी मी या सभागृहात रेकाॅर्डवर ठामपणे सांगतो की मराठा सामाजाला त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देताना आम्ही दुसऱया कोणत्याही समाजाचा एक कणसुद्धा काही काढून देणार नाही हे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारीने सांगतो, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात दिली.

मराठा आरक्षणावर राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय मागील सरकारमध्ये घेतला तो सर्वांनी मिळून घेतला.

तेव्हा आपण सर्व एकत्र होतो. यावर उच्च न्यायालयात आपण केस जिंकलो. सर्वोच्च न्यायालयात आपण जी वकिलांची फौज दिली होती ती जशीच्या तशी ठेवली आहे. भूमिकेत कोणताही बदल केलेला नाही. वेळोवेळी विविध ज्या संघटना आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करीत आहोत. अशोक चव्हाण वारंवार वकिलांशी विचारविनिमय करीत आहेत. तेव्हा सर्वानुमते आपण ही लढाई लढत आहोत आणि ती जिंकणारच, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

जातीपातीत आग लावणाऱयांवर पाणी टाकावं लागेल

मराठा समाजाच्या न्याय हक्काची लढाई लढताना. कुणाच्या तरी सडक्या डोक्यातून हे टुमणं निघालं आहे… ओबीसींच्या आरक्षण कमी करणार का, त्यात हे आरक्षण घुसडणार का? अशा प्रकारे जे कोणी समाजविघातक शक्ती जातीपातीत संघर्ष किंवा आग लावण्याचं काम करीत असतील. त्या आगीवर पाणी टाकावं लागेल. आपण नाही टाकलं तर हा महाराष्ट्राची जनता त्यावर पाणी टाकल्याशिवाय राहणार नाही , असा इशाराच मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.


error: Content is protected !!