दोन आठवड्यांतच घरगुती सिलिंडरच्या किंमतीत 100 रूपयांनी वाढ:सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री
नवी दिल्ली – तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. 14.2 किलो सिलिंडर (एलपीजी सिलिंडर) च्या किंमतीत 50 रुपयांची वाढ करण्यात आली असून 5 किलो सिलिंडरच्या किंमतीत 18 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर 19 किलो सिलिंडरमध्ये 36.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे.
देशातील सर्वात मोठी तेल कंपनी आयओसीनुसार, दिल्लीत 14.2 किलो विना अनुदानित गॅस सिलिंडरची किंमत आता 644 रूपये, कोलकातामध्ये 670.50 रुपये, मुंबईत 644 रुपये आणि चेन्नईमध्ये 660 रुपये झाली आहे. दोन आठवड्यांतच कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 100 रूपयांनी वाढ केली आहे.
यापूर्वी 1 डिसेंबर 2020 रोजी एलपीजी गॅस सिलिंडरचे दर वाढविण्यात आले होते. 19 किलो गॅस सिलिंडरची किंमत 55 रुपयांपर्यंत वाढविण्यात आली होती. तथापि, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसीने एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणतेही बदल केले नव्हते.
एलपीजी सिलिंडरची किंमत तपासण्यासाठी तुम्हाला सरकारी तेल कंपनीच्या संकेतस्थळावर जावे लागेल. येथील कंपन्या दरमहा नवीन दर जारी करतात.
https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या वेबसाईटवरून तुम्ही तुमच्या शहरातील गॅस सिलिंडरची किंमत तपासू शकता.