महत्वाची बातमी:कोरोना लसीकरण होणार पण त्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी

नवी दिल्ली – करोना लसीकरणाबाबत केंद्र सरकारने आज मार्गदर्शक सूचना जारी केल्या. दररोज प्रत्येक सत्रामध्ये 100 ते 200 जणांना लसीकरण केले जाईल. लस दिल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत त्यांच्यावर लक्ष ठेवले जाईल.

या काळात लसीचा कोणताही विपरीत परिणाम होत नसल्याचे बघितले जाईल, असे या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे. करोना लसीकरणासाठी कोविड-19 व्हॅक्‍सिन इंटिलिजन्स नेटवर्क (को-विन) या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर केला जाईल.

लसीकरणाच्या प्रत्येक ठिकाणी लाभार्थ्यांची पूर्वनोंदणी आणि त्यांचा प्राधान्यक्रम निश्‍चित केला असेल. लसीकरणाच्या जागेवर ऐनवेळी नोंदणीची सोय उपलब्ध नसेल. लस उत्पादकांकडून जिल्हा पातळीवर लस उपलब्ध करून देण्याची सूचना राज्यांना करण्यात आली आहे, कोविड प्रतिबंधाची दुसरी लस साठ्यामध्ये मिसळली जाऊ नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे
राज्य सरकारांनी सर्वसमावेशक लसीकरणासाठी प्रभावी संवाद यंत्रणा आणि नागरिकांच्या हालचालींना बाबतचे धोरण निश्‍चित करावे, असेही या मार्गदर्शक सूचनेत म्हटले आहे.

लसीकरणासाठीचा प्राधान्यक्रम निश्‍चित करताना नागरिकांमध्ये अस्वस्थता आणि अविश्वास निर्माण होऊ देऊ नये. तसेच लसीकरणाबाबत कोणत्याही अफवा आणि नकारात्मक प्रसार सोशल मीडिया या माध्यमातून होणार नाही, याकडेही लक्ष दिले जावे. गर्दी नियंत्रणात आणणे शक्‍य नसल्यास लसीकरण पथकामध्ये एका अतिरिक्त लसीकरण अधिकाऱ्याला प्रत्येकी 200 लाभार्थ्यांमागे उपलब्ध करून दिले जावे, असेही या सूचनांमध्ये म्हटले आहे.

कोविड-19 ची लस आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि वयाची 50 वर्षे ओलांडलेल्या नागरिकांना प्राधान्याने देण्यात यावी. या गटामध्येही 60 वर्षांवरील आणि 50 ते 60 वर्षांवरील नागरिकांचे उपगट केले जावे. त्यापाठोपाठ 50 वर्षांच्या आतील नागरिक आणि प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्रातील नागरिकांना लस देण्यात यावी. सर्वात शेवटी साथीची परिस्थिती आणि उपलब्ध लसीच्या उपलब्धतेनुसार प्राधान्यक्रम ठरवण्यात यावा.

पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी 30 कोटी नागरिकांना लोकसंख्येला लस देण्याचे नियोजन आहे. यासाठी “को-विन’ या संकेतस्थळावर नोंदणी आवश्‍यक असेल या नोंदणीसाठी छायाचित्रे असलेल्या 12 कागदपत्रांपैकी एखादे आवश्‍यक असेल. त्यामध्ये निवडणूक ओळखपत्र, आधार कार्ड, वाहन चालक परवाना, पासपोर्ट आणि निवृत्तिवेतनाची कागदपत्रांचा समावेश आहे


error: Content is protected !!