चौथ्या लॉकडाऊनची नियमावली उद्या जारी होणार
मुंबई: राज्यातील करोना रुग्णांचा आकडा ३० हजारावर गेला असून करोना रुग्णांची संख्याही दिवसागणिक वाढत चालल्याने राज्यातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनच्या अटी आणि शर्ती बाबत उद्या नियमावली जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये नागरिकांना काय दिलासा देण्यात येणार आहे, त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी लॉकडाऊन वाढवल्याचा अध्यादेश जारी केला आहे. तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनचा आज शेवटचा तिसरा दिवस होता. राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊन वाढवण्यात येणार असल्याची चर्चा होती. त्यानुसार आज हा लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र, लॉकडाऊनबाबतचे नवे नियम अद्याप जारी करण्यात आलेले नाहीत. चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनबाबतच्या केंद्राच्या गाईडलाइन न आल्याने राज्यातील नवी नियमावली अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. ही नियमावली उद्या जाहीर करण्यता येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.