ऑनलाइन वृत्तसेवापुणे

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज्यांच्या समाधीची11ब्रह्मवृंदांच्या वेदघोषात होणार पहाट पूजा

आळंदी (पुणे) – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज्यांच्या 724 व्या संजीवन समाधी सोहळ्यास मंगळवार (दि. 8) पासून दिमाखदार प्रारंभ झाला आहे. आज शुक्रवारी (दि. 11) 11 ब्रह्मवृंदांच्या वेदघोषात कार्तिकी एकादशीची मुख्य पहाट पूजा होणार आहे. विविध धार्मिक कार्यक्रमांनी माउलींचे संजीवन समाधी मंदिर गजबजून गेले आहे. मंगळवारी हैबत बाबा पायरी पूजन, बुधवारी नित्यपूजा आणि कीर्तनकारांच्या कीर्तनसेवा पार पडल्या आहेत.

गुरुवार (दि. 10) रोजी पहाटे पवमान अभिषेक, दुधारती, दुपारी महानैवद्य असे नित्य पूजाविधी कार्यक्रम झाले असून, सायंकाळी हभप गंगूकाका शिरवळकर, हभप धोंडोपंत अत्रे, हभप वासकर महाराज यांची कीर्तनसेवा झाली. गुरुवार असल्याने श्रींची पालखी प्रदक्षिणा आणि रात्री हभप वाल्हेकर महाराज यांचा जागर झाला.

आज शुक्रवार (दि.11 ) पहाटे 2 ते 3 या वेळेत होणाऱ्या एकादशी पहाटपूजेसाठी गुरुवार (दि. 10) मध्यरात्री बारानंतर
मोजक्‍याच व्यक्तींना मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर कार्तिकी यात्रेत संचारबंदी लागू करण्यात आल्याने यंदा प्रशासनाने परवानगी दिलेल्या संख्येत पन्नास व्यक्तींनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. पहाट पूजा झाल्यानंतर नित्य कार्यक्रम होणार असून, दुपारी माउलींना महानैवेद्य दाखविण्यात येणार आहे. दुपारी एकनंतर माउलींची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी बाहेर पडणार नसून, मंदिरातच पालखीची प्रदक्षिणा होणार आहे.

शनिवारी (दि. 12) मध्यरात्री प्रांताधिकारी यांच्या हस्ते पहाटपूजा माउलींच्या समाधीवर होईल. त्यानंतर दुपारी रथोत्सवासाठी माउलींची पालखी बाहेर पडेल. मात्र स्वंयचलित वाहनातूनच रथोत्सवास परवानगी देण्यात आली आहे. यावेळी हरिभाऊ बडवे आणि केंदूरकरांच्या वतीने कीर्तन होईल. त्यानंतर मानकरी, दिंडीकरी, सेवेकरी यांना नारळप्रसाद वाटप केले जाणार आहे. कार्तिक वद्य त्रयोदशीला रविवारी (दि .13) रोजी माउलींचा मुख्य समाधिदिन सोहळा असून, मध्यरात्री माउलींच्या समाधीवर प्रमुख विश्वस्त डॉ. विकास ढगे पाटील यांच्या हस्ते पवमान अभिषेक आणि नामदेवराय यांच्या हस्ते महापूजा केली जाणार आहे.

त्यानंतर सकाळी दहा ते बारा या कालाव धित विणामंडपात माउलींच्या समाधी सोहळ्याचे कीर्तन पंढरपुरातील संत नामदेवांचे वंशज नामदास महाराज यांचे होईल. दुपारी बारा वाजता घंटानाद, पुष्पवृष्टी आणि आरती झाल्यानंतर माउलींचा समाधी दिनाचा कार्यक्रम पूर्ण होईल. त्यानंतर आरफळकरांच्या वतीने जागरचा कार्यक्रम होईल. शेवटी अमावस्येला, सोमवारी (दि.14) समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमाची सांगता छबिना मिरवणुकीने होईल.

गुरुवारची नव्हे, तर शुक्रवारची एकादशी साजरी होणार

यंदा कार्तिकी कृष्ण पक्षात गुरुवारी स्मार्त एकादशी व शुक्रवारी भागवत एकादशी अशा दोन एकादशी आल्याने कोणती एकादशी साजरी करायची आणि द्वादशी व त्रयोदशी कधी साजरी करायची, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. जवळपास सर्वच दिनदर्शिकांमध्ये सोहळा शुक्रवारी (दि. 12) दाखवला आहे आणि एकादशी गुरुवारी दाखवली आहे. यामुळे गोंधळाची अवस्था होती. यावर देवस्थानने मागेच खुलासा केला असून, वारकरी संप्रदायात भागवत एकादशीला महत्त्व असल्याने त्यानुसार सोहळा पार पडणार आहे. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार शुक्रवारी एकादशी पाळली जाणार असून त्रयोदशीचा संजीवन समाधी सोहळा शनिवारी दि. 12 ऐवजी रविवारी (दि. 13) साजरा होणार आहे.