दोषींचे निलंबन तर कर्तव्याचा सत्कार;बीडच्या एसपी पोद्दार यांची कारवाई

बीड : पुण्या-मुंबईहून आणि इतर जिल्ह्यातून विनापास तसंच लोकं चुकीच्या पद्धतीने बीड जिल्हा हद्दीत येत आहेत, अशा तक्रारी ऐकायला मिळतायेत. विशेष म्हणजे चेक पोस्टवर सुद्धा पास नसलेल्या गाड्यांना सोडलं जातं का? हेच पाहण्यासाठी बीड पोलिसांनी चक्क चेक पोस्टवर स्टिंग ऑपरेशन केलं. यावेळी दोषी आढळलेल्या पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे तर ज्यांनी चांगलं कर्तव्य बजावलं त्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. एस.बी.उगले,  एम.के. बहीरवाळ, डी.बी.गुरसाळे अशी निलंबित पोलिस कर्मचार्‍यांची नावे असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली.

या स्टिंग ऑपरेशनमध्ये गेवराई ठाणे हद्दीतील शहागड-खामगांव चेकपोस्टवर डमी प्रवाशांनी चेकपोस्टवर जिल्ह्यात येण्यासाठी विनंती केल्यावर तेथील पोलीस कर्मचार्‍याने डमी प्रवाशाकडे पैसे मागितले.  याचा अर्थ याचे पोस्टवरून काही पोलीस पैसे दिल्यावर गाडी जाऊ देत होते. या प्रकरणात विनापास प्रवाशी प्रवेश करण्यास मदत केली म्हणून तीन पोलीस कर्मचार्‍यांना बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी त्वरीत शासकीय सेवेतून निलंबित केले आहे. अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी जिल्ह्यात काल दिवसभर व रात्रीही या चेकपोस्टवर खाजगी डमी प्रवासी वाहनासह चेकपोस्टवर आणून हे स्टिंग ऑपरेशन केले. या स्टिंग ऑपरेशनमुळे बीड जिल्ह्याच्या चेक पोस्ट वरील सुरक्षा आणखी कडक होणार आहे.स्टींग ऑपरेशनदरम्यान मातोरी येथील चेकपोस्टच्या ठिकाणी डमी प्रवासी यांनी अहमदनगर जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी मातोरी चेकपोस्टवरील कर्मचार्‍यांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता त्या इसमास जिल्ह्यात प्रवेश दिला नाही. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल डी.एम.राऊत, डी.एम.डोंगरे, टी.यु. पवळ यांना पोलीस अधीक्षकांकडून प्रोत्साहनपर प्रत्येकी 5000 रुपयांचे बक्षीस दिले आहे.शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास अंभोरा ठाणे हद्दीतील दौलावडगांव येथील चेकपोस्टवर डमी प्रवाशाला पाठवण्यात आले. त्याने अहमदनगर जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात प्रवेश करताना दौलावडगाव चेकपोस्टवरील कर्मचार्‍यांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता त्या प्रवाशी व्यक्तीला बीड जिल्ह्यात प्रवेश दिला नाही. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल चेकपोस्टवरील एस.ए.येवले, व्ही.एस.माळी यांना प्रोत्साहनपर प्रत्येकी 5 हजार रुपये बक्षीस मंजूर करण्यात आले आहे.बीड जिल्ह्यात दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे हे रुग्ण सुद्धा मुंबईहून छुप्या पद्धतीने आपल्या गावी येऊन थांबले होते आणि जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या इतर जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव वाढत असतानाच बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या 23 चेक पोस्टवर आता सुरक्षा आणखी चोख करण्याचे आदेश बीडच्या एसपींनी दिले आहेत. पोलिसांनी स्वतः पोलिसांच्या कामाची तपासणी करण्यासाठी स्टिंग ऑपरेशन केल्यामुळे बीड जिल्ह्यातील पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!