दप्तर दिरंगाई केल्यास शिस्तभंगाची कारवाई : शालेय विभागाला शिक्षण आयुक्‍तांचे आदेश

पुणे – राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या विविध कार्यालयातील दप्तर दिरंगाई झाल्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेशही शिक्षण आयुक्‍त कार्यालयाने जारी केले आहेत. यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालक, अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अध्यक्ष बालभारतीचे संचालक, सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक ही शिक्षण विभागाची महत्वाची कार्यालये आहेत.

विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी, संस्थाचालक, संघटनांचे पदाधिकारी या कार्यालयात कोणत्या ना कोणत्या कामानिमित्त येत असतात.

विविध प्रकरणे दाखल करत असतात. त्यावर वेळीच कार्यवाही होताना दिसतेच असे नाही. या कार्यालयातून न्याय न मिळाल्याने शिक्षण आयुक्त कार्यालयात दाद मागण्यासाठी सतत गर्दी होतानाचे चित्र अनेकदा पहायला मिळते.

टपालावर कार्यालयीन कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध घालण्याची गरज आहे. नियमित आढावा बैठकीत प्राप्त होणाऱ्या टपालाचा कार्यासननिहाय आढावा घेऊन दप्तर दिरंगाई होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्या दृष्टीने आवश्‍यक त्या सूचना द्याव्यात, असे आदेशही प्रशासन अधिकारी राजेश शिंदे यांनी काढले आहेत.


error: Content is protected !!