संपादकीय

भाजपची विजयी घौडदौड

बिहार विधानसभा आणि अन्य महत्त्वाच्या राज्यांमधील पोटनिवडणुकांच्या निकालांचा बहुतांशी कल आज सायंकाळपर्यंत हाती आला असून त्यात भाजपने लक्षणीय यश प्राप्त केल्याचे दिसून आले आहे. गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, उत्तरप्रदेश अशा राज्यांतील पोटनिवडणुकांमध्येही भाजपने मोठे यश प्राप्त केले आहे. 

यात मध्यप्रदेशात होणाऱ्या 28 जागांच्या पोटनिवडणुकीलाही मोठेच महत्त्व प्राप्त झाले होते. यातील किमान आठ जागा जिंकणे विद्यमान भाजप सरकारसाठी आवश्‍यक होते. कारण त्यावरच त्या सरकारचे भवितव्य अवलंबून होते. पण प्रत्यक्ष मतदानापूर्वी कॉंग्रेस नेते कमलनाथ यांनी मध्यप्रदेशात मोठी हवा निर्माण केली होती. त्यांना अनुकूल अशी वातावरण निर्मितीही तेथे झाली होती. त्यामुळे शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारचे नेमके काय होणार या विषयी बरेच कुतूहल निर्माण झाले होते. तथापि, मध्यप्रदेशातील ही निवडणूकही भाजपने मोठ्या फरकाने जिंकली आहे. त्याच बरोबर भाजप सरकारला आता तेथे स्पष्ट बहुमतही प्राप्त झाले आहे. मध्यप्रदेशातील पोटनिवडणुका कमलनाथ व कॉंग्रेसची तेथील हवा पाहून जाणीवपूर्वक लांबवल्या गेल्या. त्यातून भाजपने तेथील राजकीय वातावरण योग्य त्या डावपेचांचा वापर करून बदलून टाकले. सत्तेचा निवडणुकीच्या राजकारणासाठी कसा वापर करायचा याचे उत्तम तंत्र भाजपने अवगत केले आहे. त्याचा वापर करून भाजपने येथे आपली मांड अधिक मजबूत करून कमलनाथ यांचे आव्हान मोडीत काढले आहे. 

या राज्याबरोबरच उत्तरप्रदेशात होणाऱ्या विधानसभांच्या सात जागांच्या पोटनिवडणुकीविषयीही राजकीय क्षेत्रात कुतूहल होते. तेथे नुकतेच जे हाथरस प्रकरण झाले त्यावरून योगी सरकारच्या विरोधात संपूर्ण देशभर रान माजवण्यात आले होते. त्यामुळे या बिघडलेल्या वातावरणात या पोटनिवडणुकांच्या निमित्ताने योगी सरकारची कसोटी लागणार होती. ही कसोटीही भाजपने जिंकली आहे. अर्थात, सात पैकी सहा जागा पूर्वी भाजपकडेच होत्या, त्यामुळे राजकीयदृष्ट्या या विजयाला महत्त्व नसले तरी या जागांवर पक्षाचे नुकसान झालेले नाही, ही बाबही भाजपसाठी लक्षणीय ठरली आहे. अकरा राज्यांमध्ये विधानसभेच्या एकूण 58 जागा होत्या. त्यातील सर्वाधिक जागा जिंकत भाजपने विरोधकांना पूर्ण मात दिली आहे ही बाब कमी महत्त्वाची मानता येणार नाही. बिहारमध्येही या पक्षाने जोरदार मुसंडी मारून सर्वांनाच चकीत केले आहे. एक्‍झिट पोलची एकजात सारी भाकिते एनडीएने खोटी ठरवली आहेत. कदाचित खुद्द एनडीएच्या नेत्यांनाच बिहारमध्ये असे यश अपेक्षित नसावे. त्यामुळे या यशामुळे ते हरखून गेले नसते तरच नवल. लक्षावधी स्थलांतरित मजुरांचे झालेले हाल, करोनाकाळात निर्माण झालेल्या आर्थिक समस्या अशी एकापेक्षा एक मोठी आव्हाने समोर असताना भाजप प्रणित एनडीएला बिहारमध्ये मिळालेले यश कौतुकास्पदच मानावे लागेल. 

बिहारमधील या चमत्काराचे खरे श्रेयही भाजपच्या रणनीतीकारांनाच द्यावे लागेल. नितीशकुमार यांच्या पंधरा वर्षांच्या राजवटीमुळे तेथे नैसर्गिकदृष्ट्या अँटि इन्कंबन्सीचे वातावरण निर्माण झाले होते. त्याचा योग्य तो लाभ विरोधी पक्षाच्या नेत्यांना उठवता आला नाही. तेजस्वी यादव यांच्या सभांना गर्दी होत होती, पण त्याचे विजयात रूपांतर करण्यात त्यांना म्हणावे तसे यश आले नाही. कॉंग्रेसने बिहारमध्ये 70 जागांचा वाटा मागून घेतला, पण त्यांनाही अपेक्षित यश तेथे मिळवता आले नाही. लोक आता कॉंग्रेसवर कोठेही अवलंबून राहू इच्छित नाहीत, असाच संदेश यातून दिला गेला आहे असेही म्हणता येईल. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी तेथे जेमतेम काही सभा घेऊन केवळ औपचारिकता दाखवली. वास्तविक त्यांनी झोकून देऊन तेथे प्रचार करायला हवा होता. पण कॉंग्रेस नेत्यांनी अजून आपली जुनी राजकीय गणिते आणि राजकीय डावपेच पक्‍के कायम ठेवले आहेत. त्यातून अजून ते बाहेर पडूच इच्छित नाहीत. राहुल गांधी यांनी बिहारमध्ये फार ताकद लावली असती, तर त्याचा लाभ राजदलाच अधिक झाला असता त्यामुळे कॉंग्रेसची नेते मंडळी तेथे हातचे राखूनच सहभागी झालेली दिसली. 

स्टार प्रचारकांच्या यादीत कॉंग्रेसने तेथेही प्रियांका गांधींचे नाव टाकले होते. पण त्यांना तिकडे फिरकूही दिले गेले नाही. प्रियांका गांधी यांना चांगले ग्लॅमर आहे, त्यांच्यात मतदारांमध्ये फिरण्याची चांगली एनर्जीही आहे, त्याचा उपयोग करून घेण्यास कॉंग्रेसचे स्ट्रॅटेजिस्ट अजून का कचरतात हाही एक कोड्यात टाकणारा विषय आहे. बिहारमध्ये जमले नाही, तर प्रियांकांना मध्यप्रदेशात तरी प्रचाराला संधी द्यायला हवी होती. कारण तेथे त्यांच्याच पक्षाचे भवितव्य टांगणीला लागले होते. पण तेथेही प्रियांकांच्या ग्लॅमरचा वापर केला गेला नाही. बिहारमध्ये किंवा एकूणच ज्या ठिकाणी हे मतदान झाले, त्या राज्यांमध्ये मोदी सरकारच्या विरोधात बोलण्यासारखे किंवा त्या सरकारवर तुटून पडण्यासारखे अनेक विषय असताना कॉंग्रेसच्या नेत्यांनी नेहमीप्रमाणे मुखदुर्बळपणा दाखवला. त्या उलट जाहीरसभांमध्ये लोकांपुढे बोलण्यासारखे कोणतेही मुद्दे नसताना इलेक्‍शनचे वातावरण फिरवण्याचे काम भाजपच्या नेत्यांनी पद्धतशीरपणे केले. त्याचे यश त्यांच्या पदरात पडले आहे. महागठबंधनला बिहारमध्ये लढत देणे हे तसे खूपच आव्हानात्मक काम होते. पण भाजप व एनडीएच्या नेत्यांनी अशा आव्हानात्मक स्थितीतही चांगले यश मिळवले आहे.