NDA ने अशी ठेवली आहे निवडणुकांनी न वर घट्ट पकड

विरोधी मते फोडणे हा स्वत: निवडून येण्याचा विश्वासार्ह मार्ग नव्हे हे भाजपला आणि अधिक जागा लढवून अपयशच येते हे काँग्रेसला यापुढे लक्षात घ्यावे लागेल..

गेल्या काही विधानसभा निवडणुकांतील बेतास बात कामगिरीच्या पार्श्वभूमीवर बिहार विधानसभा निवडणुकीतील भाजपचा विजय त्या पक्षाकडे मुळातच अधिक असलेला आत्मविश्वास आणखी दुणावणारा ठरेल. त्याचप्रमाणे काँग्रेसची अतिसुमार कामगिरी त्या पक्षाचा मुळातीलच मद्दडपणा वाढवणारी ठरेल. विविध ११ राज्यांतील ५९ पोटनिवडणुकांतल्या तब्बल ४१ जागा भाजपने कमावल्या तर ३४ पैकी फक्त तीन जागा काँग्रेसला राखता आल्या. यावरून या दोन पक्षांच्या एकंदर अवस्थेविषयी रास्त अंदाज येईल. याचबरोबर बिहार राज्यात भाजपने आपल्या कामगिरीत सणसणीत सुधारणा केली. इतकी की ज्या नितीशकुमार यांच्या जनता दलाच्या कुबडय़ा भाजपला इतके दिवस त्या राज्यासाठी आवश्यक होत्या त्याच नितीशकुमार यांना भाजपच्या टेकूची गरज निर्माण झाली. यामुळे आता बिहारात भाजप-चलित नितीशकुमार सरकार सत्तेवर येईल. तूर्त भाजप-नेतृत्वाने नितीशकुमार यांचेच नेतृत्व कायम राहील असा निर्वाळा दिला आहे. पण तो कुमार यांच्यावर केलेला उपकार. या नितीशकुमार यांनी सत्तेसाठी ज्या काही कोलांटउडय़ा मारल्या आहेत ते पाहता या उपकारावस्थेस ते आत्मगौरव असेदेखील म्हणू शकतात. असो. बिहारातील विजय भाजपसाठी अनेकार्थानी महत्त्वाचा. आगामी वर्षांत पश्चिम बंगालात निवडणुका आहेत. या विजयाने भाजपचे त्या राज्यातील मनसुबे अधिक बळकट होऊ शकतील.

ही निवडणूक भाजप तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांच्यासाठीही दिशादर्शक होती. याचे कारण गेल्या काही महिन्यांत शिवसेना, अकाली दल असे रालोआचे घटक सोडून गेले असताना जनता दल काय करणार याचे उत्तर या निवडणुकीने दिले. ते असे की संयुक्त जनता दलास आता भाजपच्या सावलीत तगून राहण्याखेरीज पर्याय नाही. म्हणजे रालोआचा एक तरी घटक भाजपबरोबर आता राहील. ही वेळ नितीशकुमार यांनी स्वत:च्या हाताने ओढवून घेतली. सत्तेसाठी एकदा का कशालाही लोंबकळून राहण्याची सवय लागली की असेच होते. याची नारायण राणे ते नितीशकुमार अशी अनेक उदाहरणे आढळतील. वास्तविक या निवडणुकीत नितीशकुमार यांच्या पक्षास फार यश मिळणार नाही, अशी व्यवस्था मित्रपक्ष म्हणवून घेणाऱ्या भाजपनेच केली होती. रामविलासांचे अनेकरंगी पितृछत्र हरवलेल्या कु. चिराग यांस आपल्या पंखाखाली घेऊन भाजपनेच नितीशकुमार यांच्याविरोधात झुंजवले. निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण केल्यास दिसते ते असे की किमान ४० ते ४३ जागा अशा आहेत की नितीशकुमार यांच्या जनता दलाने कु. चिराग यांच्यामुळे गमावल्या.

हे असे होणार हे आधीपासूनच दिसत होते. पण त्याविरोधात करण्यासारखे काहीही नितीशकुमार यांच्या हाती नव्हते. त्यांचे उपमुख्यमंत्री भाजपचे सुशील मोदी यांनाही असे करणे मंजूर नव्हते. हे मोदी सध्या भाजपच्या नेतृत्वापेक्षा नितीशकुमार यांना अधिक जवळचे मानले जातात. तशी टीकाही त्यांच्यावर झाली आहे. त्यांनी कु. चिराग यांचे वर्णन ‘व्होटकटवा’ असे केले. ते शब्दश: खरे ठरले. पण या मोदी यांचे स्वपक्षात काही चालले नाही. भाजपसाठी हे राजकारण ‘उडाला तर पक्षी आणि बुडाला तर बेडूक’ असे. म्हणजे कु. चिराग यांना मोठा विजय मिळाला असता तरी ते ‘पितृतुल्य’ नरेंद्र मोदी यांच्याविषयीच्या आदरापोटी भाजपलाच पाठिंबा देते. आणि तितका काही हा प्रयोग यशस्वी झाला नाही तर कु. चिराग यांना त्यांची औकात कळेल आणि मधल्या मध्ये नितीशकुमार यांना चेपता येईल, असा हा हिशेब. अननुभवी आणि आततायी कु. चिराग यांनी तो खरा ठरवला. नितीशकुमार यांच्यावर नेम धरता यावा यासाठी त्यांनी आपला कुमार खांदा आनंदाने भाजपला वापरू दिला. परंतु यातील दीर्घकालीन धोका समजून घेण्याची त्यांची कुवत नाही. तो असा की असा ‘व्होटकटवा’ राजकारणी नेहमी ‘वापरा आणि फेकून द्या’ अशाच लायकीचा राहतो. स्वबळावर तो स्वत:ची जागा निर्माण करू शकत नाही. तेव्हा या नितीशकुमार यांचे नाक कापण्याच्या क्षुद्र आनंदासाठी कु. चिराग यांनी आपल्या पायावर धोंडा पाडून स्वत:लाच जायबंदी करून घेतले. विधानसभा निवडणुकीतील त्यांच्या पक्षाची कामगिरी हेच दर्शवते.

एका बाजूला कु. चिराग नितीशकुमार यांची मते खात होते तर दुसरीकडे असदुद्दीन ओवेसी यांचा ‘एमआयएम’ हा तेजस्वी यादव यांच्या महागठबंधनास जायबंदी करत होता. कु. चिराग यांच्याप्रमाणे त्या आघाडीचे नेतृत्वही तेजस्वी यादव या तरुणाकडे. त्यांनी चांगला जोर लावला. त्यांच्या बेरोजगारीच्या हाकेस उत्तम प्रतिसाद होता. परंतु या प्रतिसादाचे मतांत रूपांतर करण्यासाठी यंत्रणा लागते. फुटबॉलसंदर्भात असे म्हणतात की अंत:प्रेरणा आणि कौशल्य यांच्या जोरावर तुम्ही एकटय़ाने चेंडू गोलपोस्टपर्यंत नेऊ शकालही. पण सातत्याने गोल करण्याकरिता अंत:प्रेरणेस प्रयत्नांच्या सातत्याची गरज असते. ती अवस्था तेजस्वी यांच्याबाबत अद्याप आलेली नाही. त्यांच्याविरोधात भाजपने त्यांच्या तीर्थरूपांच्या जंगलराजची आठवण काढून त्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला. तो अजिबात यशस्वी झाला नाही. याचे कारण असे की या निवडणुकीतील तरुण मतदारांत लालू यादव यांच्या कारभाराबाबत काहीही मत नाही. तेव्हा भाजपस नवे अस्त्र शोधावे लागेल. त्या पक्षास त्याची गरज आहे.

या निवडणुकीतील आकडेवारी ते दर्शवते. नितीशकुमार यांना अशक्त करून आणि विरोधकांची मते फोडून भाजपने बिहार राखला हे खरे. स्वत:चे संख्याबळ होते त्यापेक्षा किती तरी वाढवले हेही खरे. पण त्या पक्षाने लक्षात घ्यावी अशी बाब म्हणजे २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तुलनेत या निवडणुकीत भाजपच्या एकूण मतांत झालेली घट. गेल्या वर्षी भाजपप्रणीत रालोआच्या पारडय़ात ५०.३ टक्के इतकी घसघशीत मते पडली होती. त्या तुलनेत या विधानसभा निवडणुकीत भाजपला १९.५ टक्के तर  रालोआला फक्त ३८.३ टक्के इतकीच मते मिळाली. एका वर्षांत या आघाडीच्या साधारण १२ टक्के मतांची वजाबाकी होणार असेल तर ही बाब महत्त्वाची. मुख्य म्हणजे ती फक्त बिहारपुरतीच मर्यादित नाही. महाराष्ट्रासह (२५.६ टक्के), हरियाणा (३७.१), झारखंड (३४.५) आणि दिल्ली (१६.६) अशा अनेक राज्यांत भाजपच्या मतांत घट झाल्याचे आढळते. विरोधी मते फोडणे हा स्वत: निवडून येण्याचा विश्वासार्ह मार्ग नव्हे.

हीच बाब काँग्रेसलाही लागू होते. सत्ताधारी भाजपच्या गंभीर चुकांची वाट पाहात बसणे हा या पक्षाचा कार्यक्रम असू शकत नाही. त्या पक्षास स्वत:चे असे निश्चित धोरण वा दिशा असावी लागेल. म्हणजे राहुल गांधी यांना पूर्णवेळ काम करावे लागेल. आताही या निवडणुकीत काँग्रेसने ७० जागा हट्टाने मागून घेतल्या. त्या तुलनेत त्या पक्षाचे यश अगदीच केविलवाणे ठरते. त्याऐवजी कमी जागा आणि अधिक ताकद/अधिक प्रयत्न असे केले असते तर इतकी लाजिरवाणी अवस्था येती ना. पण हे समजून घेण्यासाठी त्या पक्षाच्या नेतृत्वास घोडय़ावरून उतरावे लागेल. हा घोडा जागच्या जागी डुलणारा, खेळण्यातील घोडा आहे. तो पुढे जात नाही. या निवडणुकीत भाजप वगळता नेत्रदीपक कामगिरी ठरते ती तीन डावे पक्ष आणि एमआयएम यांची. या चौघांनाही मिळालेले यश त्या-त्या पक्षाला भविष्यातही पुढे नेणारे आहे. भाजपेतर पक्षांना आगामी निवडणुकांत या दोन पक्षांची दखल घ्यावी लागेल.

या निवडणुकीने एका मुद्दय़ावर शिक्कामोर्तब केले. ते म्हणजे मित्रपक्षास दुसऱ्या मित्राकडून जायबंदी करण्याचे भाजपचे कौशल्य. महाराष्ट्रात ते फसले. हरियाणात काही प्रमाणात ते यशस्वी झाले आणि बिहारात त्यास सत्ताफळे लागली. काटय़ाने काटा काढणे हे प्रचलित सत्य. पण मित्राने मित्र घायाळ करणे हे सूत्र ही भाजपची निर्मिती. परिणामी अनेक राजकीय पक्षांना भाजपच्या शत्रुत्वापेक्षा मैत्री धोक्याची वाटल्यास नवल नाही. पण ते भविष्य झाले. वर्तमानावर भाजपची मजबूत पकड आहे. या निवडणुकांनी ती अधिक घट्ट केली हे निश्चित.


error: Content is protected !!