राज्यातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याबाबत आदेश जारी
मुंबई-राज्यातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबर २०२० पासून सुरू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. यासोबतच नववी ते बारवीच्या विद्यार्थ्यांसाठी असणारे वसतिगृह आणि आश्रमशाळाही उघडण्यास मान्यता देण्यात आली आहे. शाळांनी कोणत्या प्रकारच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करायचे आहे, त्यासंदर्भातील विस्तृत जीआर शालेय शिक्षण विभागाने जारी केला आहे
शाळा सुरू करण्यापूर्वीची तयारी, शाळा प्रत्यक्ष उघडल्यावर घ्यावयाची खबरदारी, विद्यार्थ्यांची ने-आण करताना तसेच विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतरांनी एन्ट्री आणि एक्झिटच्या वेळी घ्यायची खबरदारी आदी विविध आठ प्रकारच्या सूचना राज्य सरकारने जारी केल्या आहेत.
या सूचनांचा थोडक्यात आढावा पुढीलप्रमाणे –
शाळा सुरू करण्यापूर्वी :- शाळेत व शाळेच्या परिसरात स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणविषयक सुविधा सुनिश्चित करणे. शाळेत क्वारंटाइन सेंटर असेल तर स्थानिक प्रशासनाने ते इतरत्र हलवणे. ते तेथून इतरत्र हलवणे शक्य नसेल तर शाळा इतरत्र किंवा खुल्या परिसरात भरवावी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी १७ ते २२ नोव्हेंबर २०२० यादरम्यान RTPCR चाचणी करणे बंधनकारक असेल. जे शिक्षक कोविड-१९ पॉझिटिव्ह असतील त्यांनी डॉक्टरांनी प्रमाणित केल्यानंतरच शाळेत उपस्थित राहावे. आपत्कालीन, स्वच्छता पर्यवेक्षण आदी विविध कामांसाठी कार्यगट स्थापन करणे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल अशा प्रकारची बैठक व्यवस्था करावी. एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे व्यवस्था असावी. सोशल डिस्टन्सिंग नियमांच्या अंमलबजावणीसाठी विविध चिन्हे, खुणांचा वापर करणे. शाळेत स्नेह संमेलन, क्रीड वा अन्य तत्सम गर्दी होणारे कार्यक्रम आयोजित करू नयेत. शिक्षक-पालक बैठका ऑनलाइन घ्याव्यात. विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी पालकांची लेखी संमती आवश्यक असेल. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णत: पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल. कोविड-१९ विषयक जनजागृती करणे.
शाळा सुरू झाल्यानंतर :- शाळेचा परिसर दररोज नियमितपणे स्वच्छ केला जावा. शाळेतील वर्गखोल्या, बाहेरील नेहमी स्पर्श होणारे भाग, अध्ययन साहित्य, डेस्क, खुर्च्या आदी वारंवार निर्जंतुक कराव्यात. हात धुण्याच्या ठिकाणी साबण, हँडवॉश आणि स्वच्छ पाण्याची व्यवस्था करावी. अल्कोहोलमिश्रित हँड सॅनिटायझर सर्व महत्त्वाच्या ठिकाणी ठेवण्यात यावे. स्वच्छतागृहे वारंवार निर्जंतुक करावीत. विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतरांचे दररोज थर्मल स्क्रिनींग करावे. विद्यार्थी एक दिवसाआड शाळेत उपस्थित राहतील. म्हणजेच ५० टक्के विद्यार्थी शाळेत तर ५० टक्के विद्यार्थी ऑनलाइन वर्गांना उपस्थित राहतील. गणित, विज्ञान, इंग्रजीसारखे कोअर विषय शाळेत तर अन्य विषय ऑनलाइन शिकवावेत. ऑनलाइन आणि ऑफलाइनचे वेळापत्रक तयार करावे. विद्यार्थ्यांनी पुस्तके, वही, पेन, पेन्सिल, वॉटर बॉटल आदी कोणत्याही साहित्याची अदलाबदल करू नये. शाळेच्या परिसरात चारपेक्षा जास्त विद्यार्थी एकत्र जमणार नाहीत, याची जबाबदारी मुख्याध्यापकांची असेल. प्रत्यक्ष वर्गांचा कालावधी ३ ते ४ तासांपेक्षा अधिक असू नये. प्रत्यक्ष वर्गाकरिता जेवणाची सुटी नसेल