थकीत मानधन दिवाळीपूर्वीच अदा करा:शिक्षण संचालकांचे शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश
पुणे – राज्य शासनाच्या शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या स्वयंपाकी, मदतनीस यांना ऑक्टोंबर अखेरचे थकीत मानधन दिवाळीपूर्वीच अदा करावे लागणार आहे. याबाबतचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना बजाविले आहेत.
शालेय पोषण आहार ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. योजनेअंतर्गत राज्यातील 86 हजार 400 शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या 1 कोटी 5 लाख विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते. अन्न शिजवून विद्यार्थ्यांना वाटप करणे व इतर अनुषंगिक कामकाजाकरिता शाळास्तरावर स्वयंपाकी, मदतनीसांची संख्या शाळा व्यवस्थापन समितीमार्फत नियुक्ती केली जाते.
राज्यात एकूण 1 लाख 55 हजार स्वयंपाकी, मदतनीस आहेत. शाळेतील पटसंख्येनुसार त्यांच्यासाठी दरमहा 1 हजार 500 रुपये एवढी मानधनाची रक्कमही निश्चित करण्यात आलेली आहे.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून शाळा बंदच आहेत. मात्र, योजनेची अंमलबजावणी सुरुच ठेवण्यात आली होती, त्यामुळे नियमानुसार दहा महिन्यांच्या कमाल मर्यादेत त्यांना मानधन अदा करण्यात येणार आहे. शाळास्तरावर विद्यार्थ्यांना धान्य वाटप करणे, तांदूळ व धान्यादी मालाची साफसफाई करुन सुस्थितीमध्ये ठेवणे आदी कामे करण्याबाबतचे निर्देश पूर्वीच देण्यात आलेले आहेत.
ऑक्टोंबरचे मानधन अदा करण्याबाबत प्राथमिक शिक्षण संचालक स्तरावरुन आवश्यक अनुदान सर्व जिल्हा परिषदांना उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. मात्र, अद्यापही काही जिल्ह्यातील स्वयंपाकी, मदतनीस यांना मानधन वाटप करण्यात आलेले नाही. एक-दोन महिन्यांचे मानधन थकविण्यात आले आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यात दिवाळी आहे. त्यापुर्वी मानधनाची रक्कम त्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याची कार्यवाही पूर्ण करण्याबाबतच्या सूचनाही शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. कार्यवाहीचा आढावाही लवकरच घेण्यात येणार आहे.
नागरी भागातील केंद्रीय स्वयंपाकगृहामार्फत शिजविलेल्या आहाराचा पुरवठा करणाऱ्या संस्था, बचतगट यांना सद्यस्थितीमध्ये स्वयंपाकी, मदतनीस यांच्यासाठी मानधन अदा करावयाचे किंवा कसे याबाबत केंद्र शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे, असे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.