सरकार तुमचेच! मराठा आरक्षणाची लढाई सर्व सामर्थ्यानिशी सर्वोच्च न्यायालयात लढणार – मुख्यमंत्री
मुंबई दि. २९ : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात सर्व सामर्थ्याने लढा देत असल्याचे सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उमरगा ते मुंबई असा ५८० कि.मी.चा पायी प्रवास करून आलेल्या मराठा तरुणांची भेट घेऊन त्यांना आरक्षणासंदर्भात शासन करत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली तसेच हे सरकार तुमचेच असून तुमच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले.
मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवावी या तसेच मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी उमरगा तालुक्यातील बाळासाहेब माने, पंकज जगताप, अक्षय गायकवाड, साहेब जाधव, नितीन जाधव आणि विश्वजीत चुंगे या युवकांनी उमरगा ते मुंबई असा ५८० कि.मी चा प्रवास पायी केला. यासाठी त्यांना १३ दिवस लागले. आज त्यांनी मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन आपले निवेदन मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.