एमबीबीएस प्रवेश प्रक्रिया आता 10 नोव्हेंबर नंतरच सुरू होणार
एमबीबीएस प्रवेशाच्या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना आता 10 नोव्हेंबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी 70:30 कोटा पध्दतीने प्रवेश देण्यास 10 नोव्हेंबरपर्यंत सुरूवात केली जाणार नाही अशी माहिती राज्य सरकारने आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर दिली. देशपातळीवरील 15 टक्के कोटय़ातील प्रवेश मात्र दिलेल्या वेळेत केले जातील असेही सरकारने स्पष्ट केले.
राज्य सरकारने गेल्या 7 सप्टेंबरला अधिसूचना काढून 70:30 कोटा पध्दतीनुसार प्रवेश देण्याचा निर्णय रद्द केला होता. त्याला निकिता लखोटिया या विद्यार्थिनीने उच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिले होते.
त्या याचिकेवर आज सुनावणी झाली. त्यात सरकारी वकील ए. व्ही. अंतुरकर यांनी वरील माहिती दिली.
उत्तर देण्यासाठी वाढीव मुदत द्यावी अशी विनंतीही त्यांनी केली. निकिता हिच्या वकील अश्विनी देशपांडे यांनी सरकारी वकीलांच्या विनंतीला विरोध केला. प्रवेश प्रक्रिया थांबवली गेली तर निकितासह अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याचे अॅड. देशपांडे यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर न्या. अतुल चंदूरकर आणि नितीन सुर्यवंशी यांच्या खंडपीठाने सरकारी वकिलांना उत्तर देण्यासाठी 10 नोव्हेंबरपर्यंत वेळ वाढवून दिला. मराठा आणि इतर भागातील विद्यार्थ्यांसाठी स्थानिकांना प्राधान्य देण्याचा नियम राज्य सरकारने रद्द केल्याने प्रवेशात अन्याय होत असल्याचा दावाही निकिताने आपल्या याचिकेत केला आहे.