ऑनलाइन वृत्तसेवा

हिंदू शब्दाला पर्याय व नैतिक आचरण हवे-सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

नागपूर – लोकशाही व्यवस्थेत राजकीय पक्षांमध्ये सत्तेसाठी स्पर्धा होत असते. परंतु, या स्पर्धेत निकोपता आणि विवेक असला पाहिजे. राजकीय पक्षांनी स्पर्धा आणि शत्रुत्त्व यातील फरक ओळला पाहिजे असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. ते आज, रविवारी नागपुरातील रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृति मंदिर परिसरातील महर्षि व्यास सभागृहात आयोजित विजयादशमी व शस्त्रपूजनाच्या निमित्ताने आयोजित उत्सवात ऑनलाईन बोलत होते.

याप्रसंगी सरसंघचालक म्हणाले की, राजकीय पक्षांनी सत्ताप्राप्तीसाठी प्रयत्न करणे यात नवीन काही नाही. मात्र त्या प्रक्रियेत विवेकाचे पालन निहीत आहे. राजकारणातील स्पर्धा ही शत्रूंमध्ये चालणारे युद्ध नाही.
स्पर्धा निकोप व्हायला हवी व त्यामुळे समाजात कटुता निर्माण होऊ नये. अशा स्थितीचा लाभ देशात कलह निर्माण करणारे देशविदेशातील तत्व घेतात याची जाण सर्वांनी ठेवली पाहिजे, असे परखड मत सरसंघचालकांनी व्यक्त केले. विविधतेत एकता ही भारताची ताकद आहे. मात्र अल्पसंख्यांक तसेच अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांमध्ये द्वेषपूर्ण गोष्टी पसरवून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. ‘भारत तेरे टुकडे होंगे’ अशा घोषणा देणारे लोक या कारस्थानी मंडळींमध्ये सहभागी आहेत. शासन- प्रशासनाच्या कुठल्या निर्णयावर किंवा समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट घटनांवर विरोध दर्शवत असताना राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव व सन्मान ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

हिंदू शब्दाला पर्याय व नैतिक आचरण हवे

वास्तविक पाहता हिंदू ही जीवन पद्धती आहे. परंतु, हिंदुत्त्वाला उपासनेशी जोडून फुटीरतावादी व समाजाला तोडण्याचा प्रयत्न करत असलेले तत्व जाणुनबुजून ‘हिंदुत्वाला ‘ तिरस्कार व टीकेचा पहिला निशाणा बनवितात. हिंदू कोणताही पंथ, संप्रदाय, जाती किंवा प्रांताचा पुरस्कार करणारा नसून सर्वांना जोडणारा शब्द आहे. या शब्दावर कुणालाही आक्षेप असू शकतो. आशय सारखा असेल तर इतर शब्दांच्या उपयोगावर आम्हाला कुठलाही आक्षेप नाही, असे डॉ.मोहन भागवत यांनी प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी मद्यविक्री करून धनार्जनाला नैतिकदृष्ट्या अयोग्य ठरवले. सांस्कृतिक आणि नैतिक दृष्टीने अयोग्य असलेल्या माध्यमातून होणारे धनार्जन आपली पंरपरा नसल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षकांना वेतन, विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवादरम्यान सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या भाषणाचा भर कोरोना व त्यामुळे उत्पन्न झालेल्या अडचणींवर होता. कोरोना कधी संपेल हे सांगता येत नाही व त्यासोबत जगणे शिकावे लागणार आहे. स्थलांतरामुळे अनेकांचा रोजगार गेला. अनेकांना नवीन रोजगार मिळवायचा आहे, मात्र त्यांना प्रशिक्षण नाही. त्यामुळे रोजगारांचे निर्माण व प्रशिक्षण यावर विशेष भर द्यावा लागेल, असे मत सरसंघचालकांनी व्यक्त केले. कोरोना काळात अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः शैक्षणिक संस्था परत सुरू करणे, शिक्षकांचे वेतन देणे, मुलांच्या शाळा-महाविद्यालयांचे शुल्क देत त्यांना परत अभ्यासासाठी पाठविणे या गोष्टी सद्यस्थितीत मोठ्या समस्येचे रुप घेऊ शकतात. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांची सुरुवात, शिक्षकांचे वेतन तसेच मुलांच्या शिक्षणासाठी काही सेवा सहकार्य करावे लागेल. सर्व परिस्थितीमुळे कुटुंबांमध्ये व समाजात तणाव वाढण्याची स्थिती उत्पन्न होऊ शकते. अशा स्थितीत अपराध, औदासिन्य, आत्महत्या इत्यादी वाईट प्रवृत्ती वाढू नयेत यासाठी समुपदेशनाची व्यापक आवश्यकता आहे, असे प्रतिपादन डॉ.मोहन भागवत यांनी केले.

कोरोनामुळे काही सकारात्मक बाबीदेखील समोर आल्या. या काळात स्वदेशीचे महत्त्व वाढले. शिवाय लोकांना कौटुंबिक व्यवस्थेचे महत्त्व पटले व पर्यावरण संवर्धनाकडेदेखील नागरिकांचा ओढा वाढला, असेदेखील सरसंघचालक म्हणाले. यावेळी सरसंघचालकांनी कृषी धोरणांवरदेखील भाष्य केले. कृषी धोरणामुळे शेतकरी स्वतःचे बियाणे स्वतच बनविण्यासाठी स्वतंत्र झाला पाहिजे.
शेतकऱ्यांना सहजपणे आधुनिक ज्ञानदेखील मिळाले पाहिजे. कॉर्पोरेट जगत व दलालांच्या जाळ्यातून त्याची सुटका झाली पाहिजे. कृषी व्यवस्था स्वावलंबनात भर दिला तरच स्वदेशी धोरण शक्य होऊ शकेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

चीनच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेवर नियंत्रण हवे

चीनविरोधात केंद्र शासनाने घेतलेल्या भूमिकेची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी प्रशंसा केली आहे. चीनच्या राक्षसी महत्वाकांक्षेवर नियंत्रण आणणे आवश्यक आहे व त्यासाठी आर्थिक क्षेत्रात, सामरिक क्षेत्रात,अंतर्गत सुरक्षा तसेच सीमा सुरक्षा व्यवस्थांमध्ये, शेजारी देशांसोबत तसेच आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये चीनहून मोठे स्थान प्राप्त करणे हाच एकमेव उपाय असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या महामारीसंदर्भात चीनची भूमिका संशयास्पद राहिली हे तर म्हटलेच जाऊ शकते, मात्र स्वतःच्या आर्थिक, सामरिक बळामुळे उन्मत्त होऊन भारताच्या सीमांवर ज्या पद्धतीने अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला तो संपूर्ण जगासमोर स्पष्ट झाला आहे. भारताचे शासन, प्रशासन, सैन्य तसेच जनतेने या आक्रमणासमोर उभे राहून आपला स्वाभिमान, दृढनिश्चय व शौर्याचा उज्वल परियच दिला आहे. यामुळे चीनला अनपेक्षित धक्का मिळाल्याचे वाटत आहे. या परिस्थितीत आपल्याला सावध होऊन दृढ व्हावे लागेल. चीनने याअगोदरदेखील वेळोवेळी जगाला आपल्या विस्तारवादी मनोवृत्तीची ओळख दिली आहे. आर्थिक क्षेत्रात, सामरिक क्षेत्रात, आपली अंतर्गत सुरक्षा तसेच सीमा सुरक्षा व्यवस्थांमध्ये, शेजारी देशांसोबत तसेच आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये चीनहून मोठे स्थान प्राप्त करणे हाच त्यांच्या राक्षसी महत्वाकांक्षेवर नियंत्रणाचा एकमेव उपाय आहे. या दिशेने आपल्या सत्ताधाऱ्यांच्या धोरणांची पावलेदेखील पडत आहेत, असे दिसून येते.

श्रीलंका, बांगलादेश, ब्रह्मदेश, नेपाळ हे आपले शेजारी देश, जे आपले मित्रदेखील आहेत व मोठ्या प्रमाणात समान प्रकृतीचे देश आहेत, त्यांच्यासोबत आपल्याला आणखी मित्रत्वाचे संबंध करण्याबाबत वेग वाढविला पाहिजे. या कार्यात अडथळे उत्पन करणारे मतभेत, मतांतरे, वाद इत्यादी मुद्दे त्वरित दूर करण्याचे आणखी प्रयत्न करावे लागतील, अशी अपेक्षा सरसंघचालकांनी व्यक्त केली. दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या यंदाच्या विजयादशमी उत्सवात कोरोनामुळे पथसंचलन व कवायती झाल्याच नाही. शिवाय यंदा कुठल्याही अतिथींनादेखील निमंत्रित करण्यात
आले नव्हते. सभागृहात केवळ 50 पदाधिकारी, स्वयंसेवक व घोष पथकातील सदस्य उपस्थित होते. स्वयंसेवकांनी घराजवळच गटनिहाय विजयादशमी उत्सव साजरा केला.