कोरोना संसर्ग रोखण्यास मास्कचा वापर फायदेशीर:आयआयटीचे सांशोधन

कोरोनाग्रस्तांच्या खोकल्यातून हवेत पसरणाऱ्या विषाणूंपासून संसर्ग रोखण्यास मास्क हे फायदेशीर असल्याचे पवई येथील आयआयटी मुंबईतील तज्ञांनी केलेल्या संशोधनात स्पष्ट झाले आहे. ‘सर्जिकल’ आणि ‘एन 95’ हे मास्क वापरल्यास असा संसर्ग अनुक्रम सात आणि तेवीस पटीने टाळता येतो असे या तज्ञ संशोधकांनी म्हटले आहे.

आयआयटी मुंबईतील मेकॅनिकल इंजिनियरींग विभागातील प्राध्यापक अमित अगरवाल आणि रजनीश भारद्वाज यांनी हे संशोधन केले. त्याचा अहवाल ‘अमेरिकन इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिक्स’ या नियतकालिकामध्ये नुकताच प्रसिध्द झाला आहे. कोरोनाग्रस्त रुग्ण खोकला तर त्याच्या आसपासच्या हवेमध्ये किती प्रमाणात संसर्ग पसरू शकतो याची तीव्रता त्यांनी या संशोधनात जाणून घेतली.
कोरोनाग्रस्त व्यक्ती खोकला तर त्यातून उडालेल्या सुक्ष्म तुषारांमुळे आठ सेकंदांपर्यंत आसपासच्या हवेत संसर्गाची क्षमता 23 टक्क्यांपर्यंत वाढलेली असते. संबंधित रुग्णाच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींनी मास्क परिधान केला असेल तर त्यांना संसर्ग होण्याची शक्यता कमी असते. त्याचप्रमाणे खोकताना रुग्णाने आपला कोपराकडील हात तोंडासमोर धरला किंवा रुमाल तोंडावर धरला तर हवेत विषाणू पसरण्याची शक्यताही कमी होते असे या संशोधन अहवालात म्हटले आहे.

खोकल्यातून उडणारे विषाणूयुक्त तुषार हे हवेमध्ये किती प्रमाणात पसरतील आणि किती वेळ राहतील हे त्या तुषारांचे प्रमाण, परिसराचे तापमान आणि हवेतील आर्द्रता यावरही अवलंबून असते असे संशोधकांनी म्हटले आहे. खोकल्यानंतर उडणारे तुषार हे पाच ते 14 सेकंद हवेमध्ये राहतात.


error: Content is protected !!