बीड

बीड जिह्यातील नुकसानीचे पंचनामे करून शेतक-यांना आर्थिक मदत करा-माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बीड, दि.१२ (प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. परतीच्या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. शेतकरी हतबल आणि संकटात सापडला आहे. बीड जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतक-यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केली आहे.

माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, बीड जिल्ह्यात काही दिवसापासून निसर्गाच्या अवकृपेने कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ दुर्देवी चक्र शेतक-यांच्या नशिबी येत आहे. परतीच्या पावसाने जिल्हाभरात हाहाकार उडवून दिला आहे. हजारो हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. यावर्षी सुरूवातीला चांगला पाऊस झाला. कापूस, सोयाबीन आणि खरिपाची इतर पिके चांगली आली होती. मात्र काही दिवसापूर्वीच अतिवृष्टीने उभ्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीला झालेल्या पावसामुळे बाजरीचे पीक पाण्यात गेले तर गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने सोयाबीन, कापूस, तूर आणि बाजरी आणि खरिप हंगाम उद्धवस्त झाला आहे. त्यामुळे तातडीने महसूल प्रशासनाला आदेश देवून बीड जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे करून शेतक-यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देण्याची आवश्यकता आहे. याबाबत तातडीने निर्णय घेवून महसूल प्रशासनाला आदेश देत योग्य ती कारवाई करावी असे या निवेदनात म्हटले आहे.