महाराष्ट्रमुंबई

आरे’तील मेट्रो कारशेड कुठलाही खर्च न करता कांजूरमार्गमध्ये-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबईः ‘आरे’तील मेट्रो कारशेड कांजूरमार्गमध्ये करण्यात येईल, अशी मोठी घोषणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. शासकीय जमिनीवर हे कारशेड होणार असून त्यासाठी शून्य खर्च येणार आहे, असे ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यात त्यांनी ही घोषणा केली. आरे कॉलनीतील कारशेडला महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिली होती. त्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.

गेल्यावर्षी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आरे कॉलनीत मेट्रो कारशेडची घोषणा केली होती. या कारशेडसाठी होणाऱ्या जंगलतोडीविरोधात पर्यावरणप्रेमींनी आंदोलनही छेडले होते.
आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणप्रेमींची बाजू घेतली होती. सत्तेत येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील कारशेडला स्थगिती दिली होती. लाईव्ह संवादाच्या सुरूवातीलाच मुंबईसाठी मोठी घोषणा आहे, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील कारशेड कांजूरमार्गमधील शासकीय जमिनीवर करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

आरेतील कारशेडला माझा विरोध होता. त्यामुळे आरेतील जंगलतोडीविरोधात आंदोलन करणाऱ्या पर्यावरप्रेमींविरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरेतील ६०० एकर जमीन जंगल म्हणून घोषित करण्यात आली आहे. या जंगलाची व्यापी ८०० एकर झाली आहे, असे ठाकरे म्हणाले.

आरेतील झाडे कापून तयार करण्यात आलेले कारशेडचे काम थांबवले आहे. आता मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे जमिनीवर उभारण्यात येणार आहे. कारशेडसाठी आरेत उभारण्यात आलेली इमारत इतर कामांसाठी वापरली जाईल. त्यामुळे तो पैसा वाया जाणार नाही. या भागात उभारण्यात आलेले बोगदे आणि ट्रॅक मेट्रोच्या उर्वरित मार्गाशी जोडले जातील. त्यामुळे जनतेचा एकही पैसा फुकट जाणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.