पुणे

प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लवकरच पाच दिवसांचा आठवडा

पुणे – राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लवकरच पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यासाठी उच्च शिक्षण विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उच्च शिक्षण संचालनालयाने विद्यापीठांना विचारणा केली असून, त्यांच्याकडून अभिप्राय मागविला आहे. त्यामुळे उच्च शिक्षणातही पाच दिवसांचा आठवडा सुरू होण्याची शक्‍यता आहे.
विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, अशी मागणी शिक्षक हितकारणी संघटनेसोबतच अन्य संघटनांनी उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली होती. त्यानुसार उच्चशिक्षण संचालनालयाने कार्यवाही केली आहे.
संचालनालयाचे प्रशासन अधिकारी सुयश दुसाने यांनी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलसचिवांना पत्र लिहून माहिती विचारली आहे.
यासोबतच विद्यापीठांकडून स्वयंस्पष्ट अभिप्राय मागविला आहे. त्यामुळे राज्य सरकार येत्या काही दिवसांत पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याची घोषणा करण्याची शक्‍यता आहे.