पुणेमहाराष्ट्र

11 हजारांहून अधिक वाहन चालकांचे लायसन्स निलंबित

वाहन चालविताना मोबाइल वापरणाऱ्यांना वाहतूक पोलिसांचा दणका

पुणे – वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागाकडून कारवाई करण्यात येते. या कारवाई अंतर्गत नागरिकांचे अनुज्ञप्ती (लायसन्स) देखील निलंबित करण्याची देखील तरतूद आहे. राज्यात जानेवारी ते जून 2020 या कालावधीत 11 हजारांहून अधिक वाहन चालकांचे लायसन्स निलंबित केले आहेत. विशेष म्हणजे वाहन चालवताना मोबाइलचा वापर करणाऱ्या नागरिकांचे लायसन्स निलंबित होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

निष्काळजीपणे वाहन चालवल्याने अपघातांचा धोका सर्वाधिक असल्याने सातत्याने वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येते.
परंतु, काही वाहनचालक या नियमांकडे सोयीस्कररित्या काणाडोळा करतात. त्यामुळे संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. याशिवाय बेदकारपणे वाहन चालवणाऱ्या नागरिकांचे लायसन्स देखील ठराविक कालावधीसाठी निलंबित करण्यात येते.

राज्यात 2019 मध्ये पोलीस विभागाकडून लायसन्स निलंबनासाठी एकूण 36 हजार 204 प्रकरणे प्राप्त झाली होती. त्यापैकी त्यापैकी 34,991 प्रकरणांबाबत निलंबन केले आहे. तर जानेवारी ते जून 2020 मध्ये पोलीस विभागाकडून अनुज्ञप्ती निलंबनासाठी एकूण 11 हजार 924 प्रकरणे प्राप्त झाली असून, त्यापैकी 11 हजार 031 अनुज्ञप्तींचे निलंबन झाले आहे.

यामध्ये वाहन चालवताना मोबाईचा वापर करणे, विना हेल्मेट वाहन चालवणे अशा उल्लंघनांसंदर्भात केलेले लायसन्स निलंबन अधिक आहे.