महाराष्ट्र

17 मे नंतरच्या लॉक डाऊनचा आराखडा तयार करण्याच्या मुख्यमंत्र्याच्या सूचना

मुंबई: १७ तारखेनंतर राज्यात लॉकडाऊनची स्थिती कशी असेल याबाबत काळजीपूर्वक आराखडा तयार करायचा असून प्रत्येक जिल्ह्याने आपापल्या सूचना तसेच अपेक्षा याचे नियोजन करून ते कळवावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना सांगितले. मुख्यमंत्री आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत होते.

लवकरच पावसाळा येत असून पावसाळ्यात साथीचे व इतर आजार पसरतात. करोना संकटाशी लढताना या रोगांचाही मुकाबला करावा लागेल. यादृष्टीने जिल्ह्यांतील विशेषत: खासगी डॉक्टर्स नियमितरित्या आपल्या सेवा सुरू ठेवतील हे पाहावे अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.पुढच्या काळात लॉकडाऊन शिथिल करताना कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्याजिल्ह्यांच्या सीमा मात्र सरसकट उघडण्यात येणार नाहीत याचा पुनरुच्चार करून मुख्यमंत्री म्हणाले की, आता मोठ्या प्रमाणावर मजुरांचे येणे जाणे सुरु झाले आहे. त्यामुळे आपल्याला आता खऱ्या अर्थाने सावध राहून योग्य ती वैद्यकीय काळजी घ्यावी लागेल ज्यामुळे संसर्ग वाढणार नाही. कोणत्याही परिस्थितीत कंटेनमेंट झोन्समध्ये कडक बंधने पाळली जातील हे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी पाहिले पाहिजे. या झोन बाहेर विषाणू कोणत्याही परिस्थितीत पसरला नाही पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. आपण एप्रिलमध्ये संसर्ग रोखण्यात यशस्वी ठरलो आहे. आता मे महिन्यात करोनाची मोठी संख्या पहायला मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आपल्याला करोनाची साखळी तोडायची आहे, मात्र येणाऱ्या पावसाळ्यात विविध रोग येतील. त्यात साथीचे रुग्ण कोणते आणि करोनाचे रुग्ण कोणते हे पाहावे लागेल. यादृष्टीने वैद्यकीय यंत्रणा तयारीत ठेवावी लागेल तसेच खासगी डॉक्टर्सना तयार ठेवावे लागेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
एकीकडे आरोग्य आणीबाणी आहे आणि दुसरीकडे आर्थिक आणीबाणी निर्माण होणे ही तारेवरची कसरत आहे. त्यामुळे उद्योग व्यवसायही सुरू करावे लागत आहेत. मात्र ज्या क्षेत्रात ते सुरू होत आहेत तिथे अधिक काळजी घ्यावी लागेल. ग्रीन झोन्समध्ये आपण जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरु केली आहे पण तिथेही कटाक्षाने काळजी घ्या अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *