गेवराईबीड

पाच दिवसापासून विद्युत पुरवठा बंद चकलांबा येथील लाईनमनचे दुर्लक्ष


बीड दि.12 (प्रतिनिधी) पाच दिवसापासून विद्युत खांबावरील बिघाड दुरूस्तीची मागणी करूनही विद्युत वितरण कंपनीच्या लाईनमन दखल घेतली नाही. ऐन उन्हाळ्यात लॉकडाऊनच्या काळात विद्युत पुरवठा नसल्यामुळे अतोनात हाल होत असून यासंदर्भात गांभिर्याने दखल घेवून विद्युत पुरवठा तात्काळ सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील नागरिकांनी केली आहे. सदर प्रकरणी गेवराई उपविभागीय विद्युत वितरण कंपनीच्या अभियंत्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
यासंदर्भात म्हटले आहे की, चकलांबा येथील गावठाण येथील रोकडेश्वर मंदीराच्या पश्चिम भागात असलेल्या विद्युत डिपीमधून गायआखर भागात विद्युत पुरवठा होतो. सदर भागातील एका विद्युत पोलवर बिघाड झाल्यामुळे पाच दिवसापासून सुमारे 25 ग्राहकांचा वीज पुरवठा बंद आहे. सदर बिघाड दुरूस्त करण्यासंदर्भात लाईनमन यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. विद्युत खांबावरील फ्लॉर्ट माहिती असूनही संबंधितांनी टाळाटाळ केल्याची तक्रार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
दरम्यान याप्रकरणी मंगळवार दिनांक 12 मे रोजी गेवराई उपविभागाचे उपअभियंता यांना याप्रकरणी दूरध्वनीव्दारे माहिती देण्यात आली. उपअभियंत्यानी संबंधितांना सांगूनही मंगळवारीही याप्रकरणी कार्यवाही झालेली नाही. ऐन उन्हाळा आणि लॉकडाऊनच्या काळात विद्युत बिघाड दुरूस्ती तात्काळ करावी,अशी मागणी सदर भागातील विद्युत ग्राहकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *