देशनवी दिल्ली

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध शिथिल होण्याची शक्यता?आज उद्या होऊ शकते घोषणा

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले लॉकडाउनचे निर्बंध टप्प्या टप्प्यांमध्ये शिथिल केले जात आहे. सध्या सरकारने अनलॉक ४ अंतर्गत अनेक गोष्टींसाठी परवानगी देत अर्थव्यवस्थेचा चालना देण्यासंदर्भात काही निर्णय घेत उद्योग व्यवसाय सुरु करण्यास सूट दिली आहे. आज पुन्हा सरकारकडून अन्य काही निर्बंध शिथिल करत अनलॉक ५ अंतर्गत ३१ ऑक्टोबरपर्यंत नवीन नियम जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरमध्ये देशातील अनेक भागांमध्ये वेगवेगळे सण साजरे होत असल्याने हा महिना उत्सवांचा महिना असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच एकीकडे करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसत असतानाच सरकार कोणत्या परवानग्या देते आणि कोणत्या गोष्टींवर निर्बंध कायम ठेवते याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.
मगील महिन्यामध्ये गृह मंत्रालयाने काही गोष्टींमध्ये सूट देत असल्याचे सांगत. कंटेनमेंट झोनच्या बाहेरील व्यवहारांना सूट दिली होती. आता सणासुदीच्या कालावधीमध्ये अनेक उद्योगांना ग्राहकांकडून सेवा आणि वस्तूंची मागणी वाढेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळेच सरकार अधिक गोष्टींमध्ये सूट देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सार्वजनिक ठिकाणे ज्यामध्ये मॉल, सलून, रेस्तराँ, व्यायमशाळा यासारख्या गोष्टी सुरु करण्यासंदर्भातील सूट आधीच देण्यात आली आहे. मात्र अजूनही देशभरामध्ये चित्रपटगृहे, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क सुरु करण्यात आलेले नाही. त्यामुळे सणासुदीचा कालावधी लक्षात घेता या सेवांना पुन्हा परवानगी दिली जाईल का याबद्दल आज केंद्र सरकारन निर्णय घेणार आहे. मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने चित्रपटगृह सुरु करण्यासंदर्भात परवानगी द्यावी अशी मागणी अनेकदा केली आहे. चित्रपटगृहं बंद असली तरी २१ सप्टेंबरपासून ओपन एअर थेअटर सुरु करण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे.

पश्चिम बंगाल सरकारने यापूर्वीच १ ऑक्टोबरपासून मर्यादित लोकांना प्रवेश देण्याच्या अटीवर चित्रपटगृहांना परवानगी दिली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी, परिस्थिती सामान्य व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याचमुळे जत्रा, नाटक, ओपन एअर थेअटर, चित्रपट तसेच सर्व संगीत, नृत्यू, गायन आणि जादूचे कार्यक्रम यासारख्या गोष्टींना ५० पेक्षा कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये १ ऑक्टोबरपासून परवानगी दिली जाऊ शकते. मात्र यावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणा, मास्क घालणे आणि इतर गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

मागील महिन्यामध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अणित खरे यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाला लोकांना चित्रपटगृहमांमध्ये प्रवेश देण्यासंदर्भातील एक उपाय सुचवला होता. यानुसार पहिल्या रांगेत एक आसन रिकामे ठेऊन लोकांना बसण्याची परवानगी द्यावी तर त्यामागील पूर्ण रांग मोकळी सोडावी असा सल्ला खरे यांनी दिला होता. मागील आठवड्यामध्ये एका बातमीमध्ये १ ऑक्टोबरपासून कठोर नियमांनुसार गृह मंत्रालयाकडून चित्रपटगृहांना परवानगी दिली जाईल असं म्हटलं होतं. मात्र सरकारच्या पत्रसूचना विभागानेच (पीआयबी) आपल्या फॅक्ट चेकमध्ये हा दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट केलं होतं.

अनलॉक ५ मध्ये लॉकडानमुळे पूर्णपणे कोलमडून पडलेल्या पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासंदर्भात निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. अनलॉक ५ दरम्यान पर्यटनस्थळं आणि पर्यटन केंद्र पुन्हा सुरु केली जाऊ शकतात. सिक्किम सरकारने १० ऑक्टोबरपासून हॉटेल्स, होम स्टे आणि इतर पर्यटनसंदर्भातील सेवा सुरु करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. ओदिशा सरकारनेही १ ऑक्टोबरपासून पर्यटनस्थळे पुन्हा सुरु करणार असल्याचे जाहीर केलं आहे.