पुणे

मासिक वेतन देयकात चुका आढळल्यास मुख्याध्यापकच दोषी

पुणे – प्राथमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शालार्थ प्रणालीमध्ये मासिक वेतन देयके सादर करताना ती बिनूचकच असली पाहिजेत. त्यात चुका आढळल्यास संबंधित मुख्याध्यापकास जबाबदार धरण्यात येणार आहे.

शाळांमार्फत दरमहा वेतन देयके सादर करण्यात येतात. ती सादर करताना बऱ्याचदा चुका होतात. त्यामुळे वेतनाला विनाकारण विलंब होण्याची शक्‍यता असते. मुख्याध्यापकांची मान्यता असलेल्या व सहीचे अधिकार असणाऱ्या शाळांनीच वेतन देयके तपासून फॉरवर्ड करणे गरजेचे आहे. मूळ वेतनाच्या किमान 6 टक्‍क्‍यांप्रमाणे भविष्य निर्वाह निधीची रक्‍कम कपात करणे आवश्‍यक आहे.

31 ऑगस्टपर्यंत सेवानिवृत्त, स्वेच्छा सेवानिवृत्त, मयत कर्मचाऱ्यांची शालार्थ प्रणालीमधून सेवा समाप्त करून घ्यावी. सेवानिवृत्ती होण्यापूर्वी तीन महिने अगोदर भविष्य निर्वाह निधीच्या वर्गणीची रक्‍कम बंद करण्यात यावी, अशा सूचना प्राथमिक शिक्षण विभागाच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक राजेंद्र साठे यांनी दिल्या आहेत. सप्टेंबरच्या वेतनाची देयके 19 सप्टेंबरपर्यंत अचूक सादर करावी लागणार आहेत.