तर पुन्हा लॉकडाऊनची गरजच भासणार नाही-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पुणे – करोनाविरुद्धचा लढा आपण आता घराघरात पोहोचवत आहोत. लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्या सहभागाने कोणत्याही परिस्थितीत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम यशस्वी करायची आहे. तसे झाले, तर भविष्यात लॉकडाऊन करण्याची गरज पडणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी सोमवारी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.राज्यात करोना पॉझिटिव्ह प्रमाण वाढते आहे. लॉकडाऊन काळात आपण ही लाट थोपवली होती. आता आपण हळूहळू सर्व खुले करत आहोत. आणखीही काही गोष्टी सुरू करण्याची मागणी अनेकजण करत आहेत. आज काही लाख परप्रांतीय मजूर परत राज्यात आले आहेत. एकूणच करोनाची वाढती संख्या पाहता करोनासोबत कसे जगायचे ते आता शिकवावे लागणार आहे आणि या मोहिमेत आपण तेच करणार आहोत, असे ठाकरे म्हणाले.
ऑक्सिजनचा अपव्यय टाळा
सध्या राज्यात 1000 मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन होते, मात्र गरज 500 मेट्रिक टन इतकी आहे. ऑक्सिजनचा तुटवडा राज्यात नाही, सध्या उत्पादन पुरेसे असले तरी पुढील काळात गरज पडू शकते. जिल्ह्यांनी त्यांना लागणारी ऑक्सिजनची मागणी व्यवस्थित आणि पाहिजे तेवढीच नोंदवावी. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष यासाठी सुरू करण्यात आला असून त्यांच्या संपर्कात राहावे. ऑक्सिजनचा नेमका कियी उपयोग केला जातोय त्याचे दररोज ऑडिट करावे व अपव्यय टाळावा, अशा सूचना आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास दिल्या आहेत.