बीड

सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी:सूचनांचे पालन करावे लागणार

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी गणेश मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सव 2020 च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून उत्सव साजरा करण्याबाबत निर्देश जारी

बीड, दि, 20 गणेशोत्सवाच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य शासनाने सार्वजनिक गणेशोत्सव 2020 च्या मार्गदर्शक सूचना 11 जुलै 2020 रोजी निर्गमित केल्या असून जिल्ह्यात या सूचनांचे पालन करून उत्सव साजरा करण्याबाबत अपर जिल्हादंडाधिकारी प्रवीण कुमार धरमकर यांनी निर्देश जारी केले आहेत.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्याच्या अनुषंगाने गणेश मंडळानी कोरोना विषयक नियमांचे तंतोतंत पालन करुन साध्या पद्धतीने साजरा करावा. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठक् झाली असून गणेश मंडळ पदाधिकारी आणि संबंधितांचे याबाबत चर्चा देखील झाली आहे

सर्व गणेश मंडळानी यासाठी 11 जुलै 2020 च्या परिपत्रक मधील सूचना पालन करणे बंधनकारक राहील. कोविड – 19 चा संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता व न्यायालयाने दिेलेले आदेश, महापालिका, नगर पालिकेच्या तसेच संबधित स्थानिक प्रशासनानचे मंडपाबाबतचे धोरणाशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत.

खुप डेकोरेशन होऊन गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. गणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळाकरिता 4 फुट व घरगुती 2 फुटाच्या मर्यादित असावी. गणेश मंडळामार्फत श्रीगणेशाची मुर्ती स्थापन झाल्यानंतर त्याठिकाणी कोणत्याही आरतीसाठी 5 पेक्षा जास्त नागरिक जमणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

फुले, प्रसाद, निर्माल्य यांना अनेक व्यक्तीचा संपर्क होण्याची शक्यता असल्याने यापासून कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव होऊ शकतो. त्यासाठी कमीत कमी निर्माल्य तयार होईल अशी गणेश मंडळानी आवश्यक ती व्यवस्था करावी. तसेच त्या ठिकाणी गणेश मंडळानी फुल, प्रसादाची स्वत: व्स्यवस्था करावी. शक्यतोवर भाविकांना या बाबी अणण्यास सांगू नये.

गणेश मंडळाने प्रसाद वाटप करत असतांना प्रसाद देणा-या व्यक्तींने व प्रसाद घेणा-या व्यक्तीच्या हाताला सॅनिटायझर लावून हात निर्जतुंक करुनच प्रसादाचे वाटप करावे. सांस्कृतीक कार्यक्रमाऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, रक्तदान शिबिरेे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याव्दारे कोरोना, मलेरिया, डेग्यू इत्यादी आजार आणि प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.

भजन, किर्तन व अन्य धार्मिक कार्याक्रम आयोजित करु नये. श्रीगणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीव्दारे उपलब्ध करुन देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा. गणपती मंडपामध्ये निर्जतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणा-या भाविकांसाठी शारिरीक अंतराचे ( फिजीकली डिस्टन्सींग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनीटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

श्रीचे आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करावी. लहान मुले आणि जेष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाऊ नये. कंटेनमेंट झोनमध्ये श्रीगणेशाची स्थापना करण्यास परवानगी असणार नाही. गणेश मंडळानी स्पीकरचा वापर करतांना सदरील ठिकानाच्या स्पीकरचा आवाज 75 डेसिबल पेक्षा जास्त होऊन ध्वनी प्रदुषन होणार नाही व न्यायालयाचे ध्वनी प्रदुषणबाबतचे नियम मोडले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.सर्व गणेश मंडळानी आपण जेथे श्रीगणेशाची मुर्ती स्थापन करणार आहे त्या ठिकाणचा रस्ता खराब असल्यास आपल्या अर्जामध्ये नमूद करावे म्हणजे जेणे करुन संबंधित विभागामार्फत दुरुस्ती करणे शक्य होईल.

श्रीगणेशाची स्थापना करण्याच्या अनुषंगाने आपण सर्वानी संबधित पोलीस स्टेशनमध्ये अर्ज करावा. आपण तेथून शासन नियमानुसार परवानगी देण्याची कारवाई करण्यात येइल याची नोंद घ्यावी.

श्रीगणेश मुर्तीचे विसर्जन पुढे ढकलने शक्य असल्यास या मुर्तीचे विसर्जन माघी गणेशोत्सव विसर्जनावेळी किंवा पुढील वर्षीच्या विसर्जनावेळी 2021 च्या भाद्रपद महिन्यात करता येणे शक्य झाल्यास करावे जेणे करुन आगमन, विसर्जन गर्दीत जाणे टाळून स्वत: कुटुंबियाचे कोरोना साथीच्या रोगापासून रक्षण होईल. तसेच कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रार्दुभवानुसार सार्वजनिक गणेश विर्सजणास परवानगी असणार नाही.

यासाठी संबधित नगरपालीका, नगरपंचायत, स्थानिक प्रशासनामार्फत जागो जागी जागा निश्चित करण्यात येत असून आपली मुर्ती नियुक्त केलेल्या कर्मचा-याकडे द्यावी म्हणजे श्रीगणेशमुर्तीचे विर्सजन करणे सोईचे होईल व कोविड- 19 प्रार्दुभाव देखील होणार नाही.

       महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार कोविड-19 या विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबधित नगर पालिका , पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक आहे. तसेच प्रशासनाने आणि वेळो वेळी सूचना आल्यास त्याचे देखील अनुपालन करणे बंधनकारक असेल. 
       बीड जिल्हयात फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम 144 (1) (3) अन्वये दि. 31 ऑगस्ट 2020 रोजीचे रात्री 12.00 वाजेपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.