केंद्र सरकारचा मोठा निर्णय: सरकारी नोकरीसाठी एकच सामायिक परीक्षा
सरकारी नोकरीसाठी आता वेगवेगळ्या परीक्षांच्या कचाटय़ातून देशातील तरुण वर्गाची सुटका होणार आहे. सरकारी नोकरीसाठी उमेदवारांची पात्रता सिद्ध करण्यासाठी एकच सामायिक परीक्षा (सीईटी) घेण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
त्यासाठी राष्ट्रीय भरती संस्था स्थापन करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीतील या निर्णयाची माहिती दिली.
सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांची एकच सीईटी परीक्षा घेतली जाईल.
राष्ट्रीय भरती संस्था म्हणजेच नॅशनल रिक्रूटमेंट एजन्सीमध्ये उमेदवारांना एकदा नोंदणी करावी लागेल.
या संस्थेमार्फत घेतल्या जाणाऱया सीईटी परीक्षेद्वारे उमेदवारांची गुणवत्ता सिद्ध होईल. ती गुणवत्ता देशातील सर्व सरकारी
नोकऱ्यांसाठी ग्राह्य धरली जाईल.
सरकारी नोकरीसाठी विविध राज्ये आणि संस्थांच्या वेगवेगळ्या परीक्षा असतात. उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी त्या अनेक परीक्षा द्याव्या लागतात. अनेकदा त्यांना दुसऱया राज्यांमध्येही त्यासाठी जावे लागते. यामध्ये त्यांचा बराच वेळ, मेहनत आणि पैसाही खर्च होतो. तो वाचावा यासाठी हा निर्णय महत्त्कपूर्ण ठरणार आहे.