महाराष्ट्र

दहावी, बारावीचा निकाल लांबण्याची शक्यता

पुणे  – राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने दोन महिन्यांपासून शाळा, महाविद्यालय बंदच आहेत. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मनातील भीती कायम आहे. त्यात इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणी व सबमिशनची कामे मंदावली आहेत. यामुळे या दोन्ही परीक्षांचे निकाल लांबण्याचीच शक्यता अधिक आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नऊ विभागांत एकाच वेळी या परीक्षा घेतल्या आहेत. यात बारावीची परीक्षा दि.18 फेब्रुवारी ते 18 मार्च, तर दहावीची परीक्षा दि.3 ते 23 मार्च या कालावधीत घेतली. दरम्यान, मार्चमध्ये करोनाचा प्रसार वाढू लागताच लॉकडाऊन लागू करून तो टप्प्याटप्प्याने वाढवला आहे. दहावीच्या परीक्षेसाठी 17 लाख 65 हजार 898 तर बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 5 हजार 27 एवढ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.दहावी, बारावी परीक्षेच्या काही उत्तरपत्रिका शाळा, मॉडरेटर यांच्याकडेच पडल्या आहेत. या उत्तरपत्रिका शिक्षकांनी अद्याप त्या ताब्यात घेतलेल्या नाहीत. तपासलेल्या उत्तरपत्रिकांचे विभागीय शिक्षण मंडळाकडे सबमिशनही पुरेशा प्रमाणात झालेले नाही. विभागीय शिक्षण मंडळातील अधिकारी, शिक्षक, कर्मचारी यांना लॉकडाऊनच्या कालावधीत परीक्षा कामासाठी प्रवासास मुभा द्यावी, असे आदेश शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी दिले आहेत.विभागीय मंडळाकडून शिक्षकांना फोन करुन कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना काही दिवसांपूर्वीच दिल्या होत्या. आता पुन्हा सूचना देण्यात येणार आहेत. दरम्यान, या परीक्षांचा निकाल लांबल्यास पुढील शैक्षणिक प्रक्रिया आणि फेरपरीक्षांच्या नियोजनावरही परिणाम होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *