पुणे

राज्यात अनेक ठिकाणी संततधार पाऊस राहणार

पुणे : बंगालच्या उपसागरात व अरबी समुद्रात हवेच्या दाबाची स्थिती काही प्रमाणात शिथील झाली आहे. मंगळवारी (ता.१८) या स्थितीमध्ये सुधारणा होणार आहे. त्यामुळे राज्यात आज (रविवारी) आणि उद्या ( सोमवारी) सर्वत्र ढगाळ हवामानासह अनेक ठिकाणी संततधार पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या सुत्रांनी दिला.

उत्तर भारतात असलेल्या मॉन्सूनचा पट्टा मंगळवारी (ता.१८) काही प्रमाणात सरकणार आहे. तर बुधवारी (ता.१९) उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. गुरूवारी (ता.२०) या दाबाचे चक्राकार वाऱ्यांचे रूंपातर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण व घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल.
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा जोर कमी राहणार आहे. विदर्भातील अनेक भागात पावसाची संततधार सुरू राहणार आहे.

शनिवारी (ता. १५) सकाळी आठ वाजेपर्यत महाबळेश्वर येथे १५० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. कोकणातही माथेरान, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, महाड, उल्हासनगर येथेही जोरदार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात वेल्हे, इगतपुरी, ओझरखेडा, राधानगरी, गगनबावडा, मराठवाड्यातील मुखेड, घनसांगवी, विदर्भातील सिंरोंचा, अमरावती, अहेरी जोरदार पाऊस पडला.

आज कोकणात काही ठिकाणी जोरदार व मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहणार आहे. उद्याही (सोमवारी) ही स्थिती राज्यात काही प्रमाणात अशीच राहणार असल्याचे हवामान विभागाच्या सुत्रांनी सांगितले.