जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश
मुंबई : राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शंकरराव गडाख यांच्या हातात शिवबंधन बांधलं. मातोश्री या निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन ही माहिती देण्यात आली.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत शंकरराव गडाख हे अहमदनगरमधील नेवासा मतदारसंघातून क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. अपक्ष म्हणून निवडून आलेल्या गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. अखेर आज त्यांनी हाती शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.
शंकरराव गडाख यांच्या पक्षप्रवेशाने शिवसेनेचे ताकद वाढणार आहे. माजी दिवंगत आमदार अनिल भैय्या राठोड यांच्या निधनानंतर पोकळी भरुन काढण्यासाठी गडाख यांचा शिवसेना प्रवेश पक्षाला नवसंजिवनी देणारा आहे. शिवसेनेने शंकरराव गडाख यांच्यावर नगरची जबाबदारी सोपवली आहे.