चांगली बातमी! देशात दोन करोनाविरोधी लशींची चाचणी, परिणाम सकारात्मक

नवी दिल्ली: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Health Ministry) देशवासीयांसाठी चांगली बातमी दिली आहे. देशात एकूण दोन स्वदेशी लशींची चाचणी (Trial of Corona Vaccine) घेण्यात येत असून या चाचण्याचे सकारात्मक परिणाम समोर येत आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. आज पत्रकार परिषद घेऊन आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. जेव्हा केव्हा करोनावरील लस विकसीत होईल, त्यामध्ये भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. देशातील लशीच्या उपलब्धतेसाठी जागतिक आरोग्य संघटनेव्यतिरिक्त (World Health Organisation) विविध देशांकडूनही व्यक्तीगत स्वरुपात भारताशी संपर्क केला जात असल्याचेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. देशात करोनाची लागण झालेल्या रुग्णांचा बरे होण्याचा दर सकात्मक असल्याचे भूषण यांनी म्हटले आहे. एप्रिल महिन्यात करोना रुग्ण बरे होण्याचा दर ७.८५ टक्के इतका होता. आज मात्र हा दर ६४.४ टक्के इतका झाला आहे. देशात एकूण करोनाबाधित रुग्णांपैकी १० लाखांहून अधिक लोकांनी करोनावर मात केली आहे. यात डॉक्टर्स आणि परिचारिकांचे महत्वाचे योगदान आहे, असे भूषण म्हणाले.

देशभरातील एकूण १६ राज्यांमध्ये रुग्ण बरे होण्याचा दर हा सरासरीपेक्षा अधिक आहे. या राज्यांमध्ये दिल्लीचा रुग्ण बरे होण्याचा दर ८८ टक्के, लडाखचा दर ८० टक्के, हरयाणाचा दर ७८ टक्के, आसामचा दर ७६ टक्के, तामिळनाडूचा आणि गुजरातचा दर ७३ टक्के, राजस्थानचा दर ७० टक्के, मध्य प्रदेशचा दर ६९ टक्के आणि गोव्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ६८ टक्के इतका असल्याची माहिती राजेश भूषण यांनी दिली.

दरम्यान, देशभरात गेल्या २४ तासात करोनाचे ५२,१२३ रुग्ण वाढले. याबरोबरच २४ तासांत एकूण ७७५ रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच देशात एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १५,८३,७९२ वर पोहोचली आहे. संपूर्ण देशात एकूण सक्रिय (ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत असे) रुग्णांची संख्या ५,२८,२४२ इतकी आहे. यात दिलासा देणारी बाब म्हणजे देशातील एकूण रुग्णांपैकी १०,२०,५८२ रुग्ण बरे झाले आहेत. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांपैकी आतापर्यंत एकूण ३४,९६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!