कोरोना रुग्णांच्या डिस्चार्ज नियमात बदल,आता’या’अटींनुसार रुग्णालयातून सोडणार
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना रुग्णांच्या डिस्चार्जबाबत नवीन गाइडलाइन्स जारी केल्यात
नवी दिल्ली, 09 मे : देशात कोरोनाव्हायरस (Coronavirus) रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढतो आहे आणि हेच लक्षात घेत आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (health ministry) कोरोना रुग्णांच्या डिस्चार्जबाबत नवीन गाइडलाइन्स जारी केल्यात. ज्यामध्ये रुग्णाच्या टेस्ट आणि होम आयसोलेशन याच्या नियमात बदल करण्यात आलेत.
आधी कोरोना रुग्णाला डिस्चार्ज देण्यापूर्वी कोरोना टेस्ट केल्या जायच्या मात्र आता सरसकट सर्व कोरोना रुग्णांची RT/PCR टेस्ट होणार नाही. तर फक्त गंभीर रुग्णांचीच टेस्ट केली जाईल. इतर रुग्णांना 10 दिवसांतच रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल.
Ministry of Health & Family Welfare (MoHFW) issues revised discharge policy for #COVID19 patients.
सौम्य लक्षणं असलेले रुग्ण
जर या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं कमी झाली. त्यांना ताप नसेल, ऑक्सिजनची गरज नसेल तर 10 दिवसांनंतर RT PCR टेस्ट न करता रुग्णाला डिस्चार्ज दिला जाईल.
मध्यम लक्षणं
अशा रुग्णांना कोविड हेल्थ सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड्सवर ठेवलं जाईल. त्यांचं शरीराचं तापमान आणि शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासली जाईल. 3 दिवसांपर्यंत ताप उतरला आणि पुढील 4 दिवस ऑक्सिजनची पातळी 95 टक्क्यांपेक्षा जास्त झाली तर रुग्णाला 10 दिवसांनंतर डिस्चार्ज दिला जाईल. त्याल ताप, श्वास घेण्यात समस्या आणि ऑक्सिजनची गरज भासली नाही पाहिजे. अशा रुग्णांनाही डिस्चार्ज देण्यापूर्वी टेस्टिंग करण्याची गरज नाही.
गंभीर रुग्ण
जे रुग्ण ऑक्सिजन रिपोर्टवर आहेत, त्यांची लक्षणं गेल्यानंतर आणि सलग 3 दिवस ऑक्सिजनची पातळी नियंत्रणात राहिल्यास डिस्चार्ज मिळेल. याशिवाय इतर गंभीर आजार असलेल्या कोरोना रुग्णांना क्लिनिकल रिकव्हरी आणि RT-PCR टेस्ट नेगेटिव्ह आल्यानंतर डिस्चार्ज मिळेल.
डिस्चार्ज मिळाल्यानंतर काय?
डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्या रुग्णाला घरी 14 ऐवजी 7 दिवस होम आयसोलेशनमध्ये राहावं लागेल. 14 व्या दिवसापासून टेली-कॉन्फरन्सद्वारे रुग्णाचा फॉलोअप घेतला जाईल.