राज्याच्या हितासाठीआजही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार-चंद्रकांत पाटील

मुंबई: शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येण्याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राज्याच्या हितासाठी आम्ही आजही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत. पण एकत्र आल्यावर निवडणुका मात्र एकत्र लढवणार नाही. स्वतंत्रपणेच निवडणुका लढवू, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. पाटील यांच्या या वक्तव्यामुळे तर्कवितर्क लढवले जात असून भाजप बॅकफूटवर आल्याचं बोललं जात आहे.


चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे मोठं विधान केलं. राज्या हिताच्या दृष्टीने आम्ही शिवसेनेसोबत आजही एकत्र यायला तयार आहोत. राज्याच्या हितासाठी केंद्रीय नेतृत्वाने काही फॉर्म्युला केला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तो फॉर्म्युला मान्य झाला आणि केंद्राने आम्हाला या फॉर्म्युल्याचं पालन करण्याचे आदेश दिले तर आम्ही शिवसेनेसोबत जाऊ. आम्हाला केंद्राचे आदेश पाळावेच लागतात, असं सांगताना पण शिवसेना सध्या हवेत आहे. ते एकत्र यायला तयार होतील, असं वाटत नाही, असंही ते म्हणाले. उद्या आम्ही एकत्र आलोच तर मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय हा केंद्र सरकारच घेईल, असं सांगतानाच एकत्र आलो तरी आम्ही निवडणुका वेगळ्या लढणार. एकत्रित निवडणुका लढणार नाही. एकत्रित निवडणुका लढवायच्या आणि सोयीचं राजकारण करायचं हे राजकारण योग्य नाही. एकत्र येऊन निवडणूक लढवायचं. २१ खासदार निवडून आणायचे. राज्यातही आमदार निवडून आणायचे आणि कमी सीट असूनही सत्ते निम्मा वाटा मागायचा, हे कसं चालणार?, असा सवाल त्यांनी केला.


राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर आम्ही शिवसेनेसोबत जायला तयार होतो. पण शिवसेनेचा एकत्र यायला तयार नव्हती, असा आरोप करतानाच आमच्याकडे १०५ आमदार आणि त्यांच्याकडे ५६ आमदार असं असताना ते मुख्यमंत्रिपद मागूच कसे शकतात? असा सवाल त्यांनी केला. मागायचं तर वाजवी काही मागायला हवं. थेट मुख्यमंत्रिपद? आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. राष्ट्रीय राजकारण करायचं आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, कर्नाटकसह देशातील इतर राज्यात त्याचा परिणाम होऊ शकतो, असं सांगतानाच शिवसेनेने आमच्याकडे महत्त्वाची खाती मागितली होती, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!