घाबरू नका करोना बरा होतो…हे पहा
ऍड. लाढाणे यांनीही केली यशस्वीपणे मात
पुणे – पुणे बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष ऍड. रवी लाढाणे यांनी करोनावर यशस्विरित्या मात केली. करोना हा मानसिकतेचा खेळ आहे. याबद्दल लोकांमध्ये भीतीचे वातारण आहे. वास्तविकत: लोकांनी भीती बाळगण्याचे कारण नाही. सकारात्मकतेने करोनावर विजय मिळविणे शक्य आहे, असे ऍड. लाढाणे यांनी म्हटले आहे.
करोना हा नेहमीप्रमाणे होणाऱ्या व्हायरल तापासारखा आहे. एखादा रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्यानंतर, त्याच्या घरी, सोसायटीमध्ये पालिकेची रुग्णवाहिका येते. सर्वांसमोर त्याला एकट्याला घेऊन जाते. त्यावेळीच तो खूप घाबरलेला असतो. ही भीतीच माणसाच्या जीवावर उठते.
मी उपचार घेत असताना असे जाणवले की, ज्यांच्या घरातील दोन अथवा त्याहून अधिक रुग्ण आहेत अथवा ज्यांना मित्रमंडळी, ओळखीचे खूप लोक आहेत. ते एकमेकांशी बोलतात. आनंदी राहतात, बरे होऊन घरी जातात. मात्र, जे एकटेच आहेत. कोणीही त्यांच्या ओळखीचे नाही, असे लोक मात्र शांत राहतात. परिणामी, ते नैराश्यात जाण्याची शक्यता अधिक असते. ही भीतीच त्यांचा घात करण्याची शक्यता असते, अशांना सकारात्मक ऊर्जा दिली पाहिजे.
ज्या व्यक्तीला करोना झाला आहे. त्या व्यक्तीला अथवा त्याच्या कुटुंबीयांना वाळीत टाकता कामा नये. तर, करोनाला वाळीत टाकण्याची गरज आहे. उपचार घेताना डॉक्टर वैयक्तिक भेटीला आले नसल्याचे जाणवले. मात्र, त्याने काहीही फरक पडला नाही. मला क्वारंटाइन केलेल्या ठिकाणी वेळच्या वेळी नाष्टा, जेवण येत होते. ते चांगल्या गुणवत्तेचे आहे. करोना होऊ नये, यासाठी काळजी घेतली पाहिजे. मात्र, झाल्यास त्यास सामोरे जावे, घाबरू नये करोना बरा होतो, हेच खरे आहे.