देशनवी दिल्ली

देशांतर्गत निर्मित करोना लसीचे मानवावरील चाचण्यांचे सकारात्मक परिणाम

नवी दिल्ली: भारतात निर्मित करोना लसीच्या मानवावरील चाचण्यांना सुरुवात झाली असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्‍टर हर्षवर्धन यांनी काल सांगितले. कोविड-19 विरुद्धचा लढा निर्णायक टप्प्यात प्रवेश करत असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. गेल्या अनेक महिन्यांपासूनही लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरु होते आणि त्याची सकारात्मक चिन्हे दिसून येत असल्याचे हर्षवर्धन यांनी ट्विटरद्वारे सांगितले आहे.

आरंभिक चाचण्यांमध्ये कोणतेही दुष्परिणाम दिसून आलेले नसून एकंदर 14 संस्था या चाचण्यांमध्ये सहभागी आहेत आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे वैज्ञानिक या चाचण्यांमधून मिळणाऱ्या प्रत्येक माहितीवर लक्ष ठेवून असल्याचे हर्षवर्धन यांनी सांगितले आहे. दरम्यान दिल्लीतल्या एम्स रुग्णालयाच्या समितीने को-व्हाक्‍सीन लसीची मानवी चाचणी घेण्यास मान्यता दिली आहे.

ज्येष्ठांचा मृत्यूदर रोखण्यासाठी “आयसीएमआर’चा अभ्यास…

वृद्ध व्यक्तींमध्ये कोविड 19 मुळे आजारपण आणि मृत्युदर रोखण्यासाठी बीसीजी लसीच्या परिणामकारकतेचे मूल्यांकन करण्यासाठी भारतीय औषध संशोधन परिषद अभ्यास करणार आहे. देशातल्या कोविड 19 च्या हॉटस्पॉटमध्ये राहणाऱ्या 60 ते 95 वयोगटातील लोकांवर हा अभ्यास केला जाणार आहे.

तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि दिल्ली या राज्यांमध्ये हा अभ्यास केला जाणार आहे. परिषदेच्या चेन्नई इथल्या राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्थेकडून हा अभ्यास केला जाणार आहे. या लसीद्वारे करोना संसर्ग झालेल्या वृद्ध व्यक्तींमध्ये होणारी विषाणूची प्रगती रोखू शकते का ते पाहिले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *