देशात एकाच दिवसात आढळले सुमारे 35 हजार नवे करोनाबाधित
अवघ्या 59 दिवसांत 9 लाख बाधितांची भर
नवी दिल्ली: देशात गुरुवार सकाळपासून 24 तासांत तब्बल 34 हजार 956 नवे करोनाबाधित आढळले. देशातील बाधितांच्या संख्येने प्रथमच एका दिवसात 35 हजारांचा उंबरठा गाठला आहे.
मागील काही दिवसांपासून करोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. देशात सलग सहाव्या दिवशी 28 हजारांहून अधिक बाधित आढळले. देशातील बाधितांची संख्या 1 लाख होण्यास 110 दिवसांचा कालावधी लागला. त्यानंतर अवघ्या 59 दिवसांत बाधितांमध्ये 9 लाखांची भर पडली. त्यामुळे देशातील बाधितांच्या संख्येने 10 लाखांचा टप्पा ओलांडला आहे.
देशात करोना संसर्गामुळे आणखी 687 बाधित
दगावले. एकाच दिवसातील मृतांची ती संख्या आजवरची सर्वांधिक ठरली. देशातील करोनाबळींच्या संख्येने आता 26 हजारांचा टप्पा पार केला आहे.
देशात सर्वांधिक बाधित आणि बळींची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. महाराष्ट्रापाठोपाठ तामीळनाडूत दीड लाखांहून अधिक तर दिल्लीत सुमारे 1 लाख 20 हजार बाधित आहेत. कर्नाटकने 50 हजारांचा टप्पा ओलांडला आहे.
त्याशिवाय, गुजरात, उत्तर प्रदेश, तेलंगण आणि आंध्र प्रदेशात 40 हजारांहून अधिक बाधित आढळले आहेत. महाराष्ट्रात करोना संसर्गामुळे 11 हजारांहून अधिक बाधित दगावले आहेत.
त्यापाठोपाठ दिल्लीत 3 हजार 500 हून अधिक मृतांची नोंद झाली आहे. तमिळनाडू आणि गुजरातमध्ये करोनाने 2 हजारांहून अधिक बाधितांचा बळी घेतला आहे.
एकाच दिवसात विक्रमी सुमारे 23 हजार बाधित बरे
करोना संसर्ग झालेल्या रुग्णांचे बरे होण्याचे लक्षणीय प्रमाण देशासाठी दिलासादायक ठरत आहे. गुरुवार सकाळपासून 24 तासांत देशात 22 हजार 942 बाधित करोनामुक्त झाले. एका दिवसात रुग्ण बरे होण्याचे ते प्रमाण विक्रमी ठरले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या 3 लाख 42 हजारांहून अधिक सक्रिय बाधित आहेत. तर आतापर्यंत सुमारे 6 लाख 36 हजार बाधित करोनामुक्त झाले आहेत. देशातील बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 63.33 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.