कोरोनाग्रस्तांची संख्या का वाढू लागली:एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया
नवी दिल्ली – लॉक डाऊनच्या तीन कठोर टप्प्यांनंतर देशभरामध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. मात्र अनलॉकनंतर काही ठिकाणचे कोरोनाग्रस्त मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. या वाढत्या प्रसारास आळा घालण्यासाठी काही राज्यांनी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असलेली शहरे पुन्हा एकदा लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.
अशातच आज एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी देशातील कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमागचे कारण सांगितले आहे. याबाबत बोलताना गुलेरिया यांनी, ‘देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढत असून कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढण्यामागे देशातील अवाढव्य लोकसंख्या कारणीभूत आहे.’ असं मत व्यक्त केलं.
‘देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असली तरी आपल्याकडे कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण इतरांपेक्षा खूपच अधिक असून मृत्युदराचे प्रमाण अत्यल्प आहे.’ या बाबी देखील गुलेरिया यांनी यावेळी बोलताना निदर्शनास आणून दिल्या. कोरोना विषाणूवर आतापर्यंत झालेल्या संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की या विषाणूची लागण होण्याचा धोका बाधितांच्या संपर्कात आल्यास सर्वाधिक असतो. गर्दीच्या ठिकाणी अशा व्यक्तीच्या संपर्कात आल्यासही कोरोनाची बाधा होऊ शकते. कोरोना बाधेपासून वाचायचे असल्यास फेस मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टंसिंग पाळणे महत्वाचे आहे