अभिमानास्पद:भारत हे जगासाठी औषधाचे केंद्र:60 टक्के औषधी मूळ भारतीय
नवी दिल्ली – भारत हे जगासाठी औषधाचे केंद्र मानले जात आहे. अमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या औषधांपैकी 60 टक्के औषधे मूळ भारतीय आहेत. जेनेरिक औषधांच्या निर्मितीमध्ये भारत फार पूर्वीपासूनच प्रस्थापित आहे. हे सत्य जगभरात कित्येकांना फार चांगल्यारीतीने माहिती आहे.
भारतीय विज्ञानाच्या आधारे कोविड-19 वर प्रभावी औषध लवकरच तयार केले जाईल, असा विश्वास भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी व्यक्त केला आहे. आफ्रिका, युरोप, मध्यपूर्वेत अथवा अन्यत्र कोठेही रुबेला, गोवर आणि पोलिओसारख्या रोगांवर वापरण्यात येणाऱ्या औषधांपैकी 60 टक्के औषधे मूळ भारतीयच आहेत ही बाब फारशी कोणाला माहिती नाही. त्यामुळे जगासाठी औषधांच्या पुरवठ्याबाबत भारताची भूमिका महत्त्वाची आहे.
जगात कोठेही केल्या जाणाऱ्या औषधाची गुणवत्ता भारतात किंवा चीनमध्ये तपासावी लागते. कारण हेच दोन देश औषध निर्मितीमध्ये प्रमुख आहेत. म्हणूनच सर्व जगासाठी औषधनिर्मिती करण्याच्या हेतूने सर्व जगाला भारताकडून आशा आहेत.
कोविड-19 च्या संदर्भात निर्मितीच्या दोन औषधांवर देशात फार वेगाने काम केले जात आहे. या औषधांना लवकरात लवकर मंजुरी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या औषधांच्या मानवावरील वैद्यकीय परीक्षण सुरू आहे. या औषधांच्या टॉक्सिसिटीचा उंदीर आणि सशांवरील प्रयोग यशस्वी झाले आहेत. त्याची माहिती “ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया’ला सादर केली गेली आहे. त्यानंतरच या औषधांच्या मानवावरील वैद्यकीय चाचणीला परवानगी मिळाली आहे, असे डॉ. भार्गव यांनी सांगितले.
झायडूस कॅडिला आणि भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड या दोन कंपन्यांना “डीसीजीआय’ कडून पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीची परवानगी देण्यात आली आहे. कोविड-19 वरील औषधनिर्मितीसाठी या दोन्ही कंपन्यांची “आयसीएमआर’बरोबर भागीदारी आहे.
आता या कंपन्यांच्या वैद्यकीय चाचण्यांना सुरुवात झाली असून प्रत्येक ठिकाणी सुमारे 1 हजार उमेदवारांवर ही वैद्यकीय चाचणी होत आहे. वैद्यकीय पूर्व चाचण्याही होत आहेत. तसेच पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेमध्येही औषध निर्मिती सुरू आहे. जगभरात कोविड-19 मुळे लक्षावधी लोक प्रभावित झाले असल्याने या प्रयोगाधीन औषध निर्मितीला वेगात पूर्ण केले जावे, असा प्रयत्न संशोधक करत आहेत.
अलीकडेच रशियाने वैद्यकीय चाचण्या पूर्ण केल्या आहेत. त्यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. चीन, अमेरिका, ब्रिटनमध्येही वेगाने औषध निर्मितीचे काम सुरू आहे. त्यानुसार भारतातील औषधनिर्मितीही वेगाने सुरू आहे, असे डॉ. भार्गव यांनी सांगितले.