उद्या १ वाजता बारावीचा ऑनलाईन निकाल
पुणे: महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने बारावीचा निकाल उद्या दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांची छायाकिंत प्रत देणे व पुनर्मल्यांकन, स्थलांतर प्रमाणपत्र देणे यासाठीच्या अर्जांकरीता ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या विभागांत एकाच वेळी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च कालावधीत घेण्यात आली होती.
राज्य मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार ऑनलाइन निकालानंतर विद्यार्थ्यांना विविध कामकाजासाठी शाळा, महाविद्यालय अथवा बोर्डाच्या कार्यालयात समक्ष जावून अर्ज करावा लागत होता. यंदा त्यात बदल करण्यात येणार आहे. विद्यार्थी, पालकांची गैरसोय आणि विभागीय मंडळाच्या कार्यालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी यंदा ऑनलाइन पद्धत राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार असून संबंधित परीक्षांचे ऑनलाइन निकाल जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी अर्ज करावे लागतात. या अर्जांसाठी दहावीच्या विद्यार्थ्यांनी http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करणे आवश्यक आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्याकरीता http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करावा लागणार आहे. या प्रक्रियेचे शुल्कही डेबिट व क्रेडीट कार्ड, युपीआय, नेट बॅंकींग या ऑनलाईन पध्दतीनेच भरावी लागणार आहे. मुख्याध्यापक, प्राचार्य, विद्यार्थी, पालक, शिक्षक या सर्वांनी सूचनांनी दखल घ्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या वेबसाईट्स वर पाहता येणार निकाल