दिलासादायक:आता करोनाच्या शेवटाची सुरूवात
नवी दिल्ली : भारतातर्फे करोनाची लस विकसित केली जात असून ही करोनाच्या शेवटाची सुरूवात आहे अशी प्रतिक्रीया केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने दिली आहे. या मंत्रालयाने म्हटले आहे की करोनावर लस तयार करण्याचे प्रयत्न शंभर कंपन्यांनी सुरू केले असून त्यातील 11 लसी मानवी चाचण्यासाठी सिद्ध झाल्या आहेत. त्यात भारतातील लसीचाही समावेश आहे.
भारतात तयार करण्यात आलेल्या या लसीच्या मानवी चाचण्यांना ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया या संस्थने मान्यता दिली आहे. ही मान्यता म्हणजे आता करोना रोगाचा शेवट सुरू होत असल्याचीच नांदी आहे असे या मंत्रालयाने म्हटले आहे.
ब्रिटन मधील ऍस्ट्राझेनका आणि अमेरिकेतील मॉडेर्ना या दोन कंपन्यांनी करोना लसीचे भारतात उत्पादन करण्यासाठी भारतीय कंपन्यांशी करार केला आहे. याच्या चाचण्या यशस्वी झाल्या तर त्याचेही भारतात उत्पादन सुरू होणार आहे. या दोन्ही लसींच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांच्या चाचण्यांना अनुमती देण्यात आली आहे.