विधान परिषद सदस्य नियुक्तीच्या हालचालींना वेग
मुंबई. विधान परिषदेवर पाठवायच्या राज्यपाल नियुक्त आमदारांची नावे निश्चित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. यासंदर्भात सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दादरच्या ठाकरे स्मारकात दुपारी बैठक झाली. या वेळी दोन्ही पक्षांकडून काही नावांवर चर्चा झाल्याचे समजते. शिवसेनेकडून आदेश बांदेकर, तर राष्ट्रवादीकडून राजू शेट्टी यांचे नाव निश्चित झाले आहे.
बैठकीला राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. विधान परिषदेतील राज्यपाल नामनियुक्तच्या १२ जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांच्या शिफारशींचा प्रस्ताव राजभवनला लवकर पाठवला जाईल. कारण ३ ऑगस्टपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आहे. त्यापूर्वी राज्यपालांनी १२ सदस्य निवडीचा निर्णय घेणे अपेक्षित आहे. १२ जागांचे तीन पक्षांत समान वाटप व्हावे यासाठी काँग्रेस आग्रही आहे. मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेना विधानसभेतील आमदारांच्या संख्येवर जागावाटप करण्यासंदर्भात आग्रही आहे. संख्याबळानुसार जागावाटप केल्यास शिवसेनेला ५, राष्ट्रवादीला ४ व काँग्रेसला ३ जागा मिळणार आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रात्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. या भेटीत अनलाॅक २.० संदर्भात चर्चा झाल्याचे समजते.