करोनासाठी ‘डेक्सामेथाझोन’ परस्पर घेणे घातक; तज्ज्ञांचा सल्ला

मुंबई-करोना संसर्गामध्ये ‘डेक्सामेथाझोन’ या औषधाच्या वापरामुळे अत्यवस्थ असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे दिसून येत असले तरीही वैद्यकीय तज्ज्ञांनी या औषधाच्या वापरासंदर्भात सावध पवित्रा घेतला आहे. हे औषध नवे नसून त्याचा वापर यापूर्वी श्वसन विकारासह संधीवाताच्या आजारातील काही प्रकारांमध्ये करण्यात आलेला आहे. तरीही करोनामध्ये या आजारांचे परिणाम कसे दिसतात याचा अधिक विस्तृत अभ्यास होण्याची गरज वैद्यकीय संस्थेतील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
करोना बाधित रुग्णांवर या औषधाचा वापर करून त्यांचा चाचणी अहवालाचे निष्कर्ष ऑक्सफर्ड विद्यापीठाने सादर केले. त्यात हे औषध करोना रुग्णांसाठी दिलासादायक असल्याचे नोंदवले आहे. मात्र, आयसीएमआरने या औषधाचा उपयोग काळजीपूर्वक व्हायला हवा, याकडे लक्ष वेधले आहे. उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या रुग्णांना स्टिरॉइड देण्यापूर्वी काळजी घ्यायला हवी. जर या औषधांची उपयुक्तता सर्व रुग्णांमध्ये लागू पडली तरच उपचारांमध्ये ते महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
परस्पर घेणे घातक
डेक्‍सामेथाझोन हे औषध अनेक दशकांपासून विविध आजारांमुळे शरीरात होणारा दाह कमी करण्यासाठी वापरले जात आहेत. करोनाच्या विषाणूमुळे श्‍वसननलिका, फुफ्फुसाला दाह म्हणजे सूज असल्यास या औषधाचा वापर केला जातो. महाराष्ट्रात करोनाच्या रुग्णांमधील दाह कमी करण्यासाठी हे औषध वापरले जात आहे, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले. दमेकऱ्यांना खूप दमा लागल्यास, एखादी गंभीर अलर्जी उद्भवल्यास, संधिवातात सांधे सुजल्यास हे औषध वापरले जाते. हे जीवरक्षक औषध आहे. मात्र, त्याचा विनाकरण वापर केल्यास त्याचे साइड इफेक्‍टही खूप आहेत. हे औषध कसे सुरू करावे ते कशा प्रकारे थांबवावे याचे शास्त्र आहे. त्यानुसार त्याचे डोस ठरवले जातात. परस्पर औषध घेणे घातक आहेत. काही नागरिकांनी हे औषध स्वत: घेतल्याचे प्रकार लक्षात आले आहे. त्यामुळे डॉक्‍टरच्या सल्ल्याशिवाय हे औषध घेऊ नये, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!