देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 50 टक्क्यांवर
नवी दिल्ली – देशात करोना संसर्गित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 50 टक्क्यांच्या वर गेले आहे. सध्या 1 लाख 49 हजार 348 रुग्ण उपचार घेत असून, 1 लाख 64 हजारपेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत. 50 पूर्णांक 6 दशांश टक्के रुग्ण बरे झाले आहेत. देशभरात काल करोना संसर्ग झालेले 11 हजार 929 रुग्ण आढळले होते.
देशातली एकूण करोनाबाधितांची संख्या 3 लाख 24 हजारपेक्षा अधिक झाली आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आयसीएमआरने संक्रमित व्यक्तींमध्ये करोना विषाणू शोधण्यासाठी चाचणी क्षमता वाढविली आहे. सरकारी प्रयोगशाळांची संख्या 646 पर्यंत तर खाजगी प्रयोगशाळांची संख्या 247 पर्यंत वाढविण्यात आली आहे. (एकूण 893 प्रयोगशाळा) गेल्या 24 तासांत 1,51,432 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. आतापर्यंत एकूण 56,58,614 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे.
कोविड-19 च्या वैद्यकीय व्यवस्थापन प्रोटोकॉलचा भाग म्हणून रेमडेसिविरचा वापर आणि देशातील त्याची उपलब्धता या संदर्भात काही माध्यमे वृत्त देत आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 13 जून रोजी कोविड -19 साठी एक अद्ययावत वैद्यकीय व्यवस्थापन प्रोटोकॉल प्रसिद्ध केला आहे ज्यामध्ये रेमडेसिविर या औषधाचा केवळ आणीबाणीच्या वापरासाठी मर्यादित उद्देशानेच’ ‘इन्व्हेस्टिगेशनल थेरपी ‘म्हणून तसेच टोसिलीझूमब आणि कॉन्व्हॅलेसन्ट प्लाझ्माचा ऑफ लेबल वापरासह (ते औषध ज्या आजारांवर उपचार करते त्यांव्यतिरिक्त इतर लक्षणांसाठी) समावेश केला आहे.
या प्रोटोकॉलमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की या उपचारांचा वापर सध्या मर्यादित उपलब्ध पुरावे आणि मर्यादित उपलब्धतेवर आधारित आहे. आणीबाणीत वापर म्हणून रेमडेसिविरचा वापर मध्यम आजार (ऑक्सिजनवर) असलेल्या रुग्णांमध्ये करण्याबाबत विचार केला जाऊ शकतो ,मात्र जर एखाद्या रुग्णाला एखादे औषध देऊ नये अशी सूचना असेल तर रेमडेसिविरचा वापर करू नये.