महाराष्ट्रमुंबई

शाळा तर सुरू होणारच:पण कुठल्या आणि कधी? काय म्हणाले मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई, 07 जून : लॉकडाउन 5 मध्ये अनेक अटी शिथिल करण्यात आल्या असून दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. परंतु, शाळा उघडण्यास राज्य सरकारने नकार दिला आहे. राज्यात शाळा या ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्याचा सरकाराचा प्रयत्न आहे. तसंच राज्यात ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव नाही आणि तिथे इंटरनेट नाही अशा भागात शाळा सुरू करता येतील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.

केंद्र सरकारने लॉकडाउन 5 ची घोषणा करत शाळा उघडण्याचा निर्णय राज्य सरकारांवर सोडवला आहे. राज्यात कोरोनाची परिस्थिती पाहता महाविकास आघाडी सरकारने शाळा उघडण्यास नकार दिला आहे. महाराष्ट्राच नाहीतर उत्तर प्रदेश, छत्तीसगडसह अनेक राज्ये जुलैमध्ये शाळा उघडण्यास तयार नाहीत.
मे महिन्याच्या सुट्टीत अनेक शाळांचा क्वारंटाइन सेंटर म्हणून वापर करण्यात आला. त्यामुळे अनेक राज्यांनी शाळा उघडण्यास नकार दिला आहे. महाराष्ट्रातही शाळा उघडण्यास राज्य सरकारने नकार दिला आहे. परंतु, ‘ज्या परिसरात इंटरनेट व्यवस्था आणि कोरोनाचे संक्रमण नाही, जे जिल्हे ग्रीन झोन आहे तिथे शाळा उघडल्या जाऊ शकतात. परंतू, इतर ठिकाणी ऑनलाइन शिक्षणाला प्राधान्य द्यावे लागेल. जुलै महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू केले पाहिजे’ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. याआधीही मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरू करण्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली होती. ‘मुलांचे वर्ष वाया जाऊ देणार नाही. शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते थांबू नये. कोरोना सारख्या परिस्थितीत शिक्षणाला कोणताही अडथळा येत नाही, हे महाराष्ट्रानं देशाला दाखवून द्या, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. गुगल प्लॅटफॉर्मचा प्रायोगिक स्तरावर वापर करावा. मात्र स्वतंत्रपणे संगणकीय पद्धती विकसित करून ऑनलाईन शिक्षणाची मजबूत यंत्रणा दीर्घ काळासाठी विकसित करावी, असंही मुख्यमंत्री म्हणाले होते.

दोन सत्रास भरणार शाळा

दरम्यान, केंद्र सरकारने दिलेल्या सुचनेनुसार, एका वर्गात जर 40 विद्यार्थी असतील तर एकावेळी वर्गात केवळ 20 विद्यार्थी असणं आवश्यक आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचं पालन होऊ शकतं. पण असं केल्यानं शिक्षक आणि जागेची कमतरता भासू शकते त्यामुळे दोन सत्रात शाळा- महाविद्यालयं सुरू कऱण्यात यावीत. सकाळच्या सत्रात 20 तर दुपारच्या सत्रात 20 विद्यार्थी किंवा जागेच्या उपलब्धतेनुसार विद्यार्थी संख्या ठरवावी.

ऑनलाइन-ऑफलाइन क्लासरुम

यामध्ये ज्यांना शक्य आहे किंवा 50 टक्के विद्यार्थी हे वर्गात तर 50 टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीनं शिकावं. त्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्यामुळे शिक्षक आणि शाळेतील भासणारी जागेची कमतरता या दोन्ही समस्या दूर होतील. सोशल डिस्टन्सिंगचं पालन होईल.

6 दिवसांचा होणार आठवडा

अनेक विद्यापीठ आणि शाळांमध्ये 5 दिवसांचा आठवडा आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शाळांना सुट्टी देण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी 5 ऐवजी 6 दिवसांचा आठवडा करण्यात येणार आहे.

सम विषम संख्यांचा वापर करून नियोजन

हा फॉर्म्युला साधारण प्रदूषण रोखण्यासाठी गाड्यांना वापरण्यात येतो. पण शाळा महाविद्यालयातही वर्ग आणि एकूण अभ्यासासाठी ह्या नियमाचा अवलंब करण्याचा विचार सुरू आहे. त्याचं नियोजन कशापद्धतीनं होतं हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *